लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पावसाळा सुरू झाला की, राज्यापासून स्थानिक पातळीवरील सर्व यंत्रणा साथीच्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी सज्ज होतात. त्याचप्रमाणे, यात डॉक्टर्स आणि रुग्णालयांचा मोठा वाटा आहे. मात्र, सायन रुग्णालयातील इंटर्न डॉक्टरांना डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टोच्या विळख्यात राहावे लागते आहे. याविषयी, रुग्णालय प्रशासनाला पत्र लिहूनदेखील प्रशासनाने मात्र त्याकडे कानाडोळा केला आहे. त्यामुळे आता लवकरच येथील डॉक्टर्सच ‘रुग्ण’ होतील, या भीतीने ते धास्तावले आहेत.सायन रुग्णालयात एकूण १०५ इंटर्न डॉक्टर्स आहेत. त्यापैकी ५५ डॉक्टर्स वसतिगृहात तर ३० बराकमध्ये (बैठ्या खोल्या) राहतात. रुग्णालयांच्या आवारातून जमा केलेला सर्व कचरा व सामान या वसतिगृह आणि बराकच्या जवळपास आणून टाकले जातात. या कचऱ्यात रुग्णालयातील टाकाऊ फर्निचरपासून ते ओला-सुका कचरा सगळ््याचा समावेश असतो. गेले कित्येक महिने त्या ठिकाणी स्वच्छताही केली जात नाही. त्यामुळे डेंग्यू, लेप्टो आणि मलेरियाचा धोका दिवसेंदिवस अधिकच बळावत असल्याचे, येथील डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. याविषयी, रुग्णालयाच्या आवारातील हे अस्वच्छतेचे साम्राज्य लवकरात लवकरच स्वच्छ करण्यात यावे आणि इंटर्न डॉक्टरांच्या आरोग्याचा त्वरित विचार करावा, या आशयाचे पत्र रुग्णालय प्रशासनाला देण्यात आले आहे. या पत्रासोबत अस्वच्छतेविषयी सद्य:स्थितीत वर्तविणारी छायाचित्रेही जोडण्यात आली आहे. मात्र, अद्याप प्रशासनाने कोणतीही ठाम भूमिका घेतली नसल्याचे, असोसिएशन आॅफ स्टेट मेडिकल इंटर्न्स संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रतीक मारकवाड यांनी सांगितले.समस्येवर तोडगा काढण्यासाठी रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनाही भेटण्याचा प्रयत्न केल्याचे इंटर्न डॉक्टर्सनी सांगितले. मात्र, काही तासांच्या प्रतीक्षेनंतरही अधिष्ठात्यांची भेट होऊ शकली नाही. याउलट, निवासी डॉक्टरांकडे तुमचे प्रश्न मांडा, असेही इंटर्न डॉक्टरांना सांगण्यात आले. त्यामुळे आता आणखी किती दिवस डॉक्टरांना या आजारांच्या सावटामध्ये राहावे लागणार, असा प्रश्न भेडसावत आहे.
डॉक्टरांनाच डेंग्यू-मलेरियाचा धोका!
By admin | Published: June 19, 2017 3:22 AM