Join us

आॅक्टोबरमध्येही डेंग्यूचा धोका!

By admin | Published: October 11, 2015 4:13 AM

आॅक्टोबर हीटचे चटके बसायला लागल्यावर डेंग्यूचा डंख होणे कठीण, या भ्रमात मुंबईकरांनी राहू नये. पावसाळ्यानंतरच आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूचा फैलाव होत असल्याचे गेल्या चार वर्षांच्या

- पूजा दामले, मुंबईआॅक्टोबर हीटचे चटके बसायला लागल्यावर डेंग्यूचा डंख होणे कठीण, या भ्रमात मुंबईकरांनी राहू नये. पावसाळ्यानंतरच आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूचा फैलाव होत असल्याचे गेल्या चार वर्षांच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूपासून वाचण्यासाठी मुंबईकरांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्यापूर्वीचा म्हणजेच आॅक्टोबर महिन्याचा कालावधी हा डासांची उत्पत्ती होण्यास पोषक असतो. पावसाळा संपल्यावर पाणी कुठे साचणार, असा विचार केला जातो. प्रत्यक्षात घरातील अनेक ठिकाणी साचलेले पाणी असते, त्याचबरोबरीने घराच्या आजूबाजूलादेखील पाणी साचलेले असते. याच पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. पावसाळा सुरू झाल्यावर म्हणजे जून, जुलै महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी असते. आॅगस्ट महिन्यापासून डेंग्यूचे रुग्ण आढळू लागतात. पण सप्टेंबरपेक्षा आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते, असे साथरोग नियंत्रण कक्षाच्या प्रमुख डॉ. मिनी खेतरपाल यांनी सांगितले.घरातील एखाद्या व्यक्तीला डोकेदुखी, ताप, अंगावर पुरळ असा त्रास जाणवू लागल्यास तत्काळ त्याला डॉक्टरकडे नेले पाहिजे. त्याचबरोबरीने घरात आणि घराच्या आजूबाजूच्या परिसरात कुठे पाणी साचून राहिले आहे का? याचा शोध घेतला पाहिजे. घरातल्या एका व्यक्तीला डेंग्यू झाल्यास इतरांनाही डेंग्यू होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे डेंग्यू रोखायचा असल्यास घरात सात दिवसांहून अधिक काळ पाणी साठवून ठेवू नये, असे डॉ. खेतरपाल यांनी सांगितले.यंदा पाऊस कमी झाल्यामुळे मुंबईवर पाणीकपातीचे संकट ओढावले आहे. सध्या मुंबईत २० टक्के पाणीकपात आहे. त्यामुळे यंदा आॅक्टोबर महिन्यात मुंबईकरांनी अधिक सतर्क राहिले पाहिजे. मुंबईतल्या अनेक ठिकाणी कमी पाणी येत असल्यामुळे पाणी साठवून ठेवले जाते. पिंपात, टाक्यांमध्ये साठवलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ शकते. साठवलेले पाणी पूर्ण बंद ठेवले पाहिजे. थोडासा भाग उघडा राहिला तरीही डास आत जाऊ शकतात, ही बाब लक्षात घेणे गरजेचे आहे, असे एका महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.