Join us

षण्मुखानंदमध्ये दुदमवाडीचे बहुरंगी नमन...!

By admin | Published: January 03, 2017 5:57 AM

मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात कला सादर करणे ही प्रत्येक कलावंताची इच्छा असते. पण हे सहजसाध्य होतेच असे नाही. मराठी व्यावसायिक नाटकांचे प्रयोगही इथे क्वचितच होतात

राज चिंचणकर , मुंबईमुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात कला सादर करणे ही प्रत्येक कलावंताची इच्छा असते. पण हे सहजसाध्य होतेच असे नाही. मराठी व्यावसायिक नाटकांचे प्रयोगही इथे क्वचितच होतात. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीतल्या गोळवली गावच्या दुदमवाडीला या सभागृहात कोकणातल्या लोककलेचे वैशिष्ट्य असलेले ‘नमन’ सादर करण्याचा मान मिळाला आहे.कोकणातल्या दुदमवाडीचे रंगकर्मी अशोक दुदम आणि त्यांचे सहकारी मुंबईच्या या प्रतिष्ठित अशा सभागृहात बहुरंगी नमनाचा खेळ रंगवण्यास सज्ज झाले आहेत. कवी, नर्तक, वादक आणि दिग्दर्शक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या अशोक दुदम यांनी कोकणात रंगवलेले ‘दुदमवाडीचा राजा’ हे नमन अतिशय गाजले होते. यातूनच प्रेरणा घेत त्यांनी नमनाचे विविध कार्यक्रम आतापर्यंत सादर केले आहेत. त्यांच्या या ध्यासाचे प्रतिबिंब संपूर्ण आशिया खंडात नावाजलेल्या अशा षण्मुखानंद सभागृहात पडणार आहे. ८ जानेवारी रोजी हे बहुरंगी नमन येथे सादर करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. या सादरीकरणासाठी मुंबईच्या रुईया महाविद्यालयाच्या पटांगणात त्यांनी, त्यांच्या २५ सहकाऱ्यांसह जोरदार तालीम केली आहे. तीन हजार आसनांची क्षमता असलेल्या षण्मुखानंद सभागृहात समस्त कोकणातल्या ३८ गावांतून अडीच हजारांहून अधिक रसिक या कलेचा रसास्वाद घेणार आहेत. अशोक दुदम यांच्या या नमनाचे दिग्दर्शन के. राघवकुमार यांचे आहे. ‘शृंगारी गवळण’ आणि ‘नाद पंढरीचा’ हा वग असे या नमनाचे स्वरूप आहे.