मुंबई : कांदिवली पूर्वेकडील स्कायवॉक बेघरांचा अड्डा, फेरीवाल्यांचे बस्तान इत्यादी समस्यांमुळे प्रवाशांना ये-जा करणे त्रासदायक ठरत होते. परंतु आता स्कायवॉकवरील समस्यांची दखल महापालिकेने घेतली असून, बेघरांना हटविले आणि फेरीवाल्यांवर कारवाई करून प्रवाशांसाठी स्कायवॉक मोकळा करून दिला. कांदिवली स्कायवॉक हा बेघरांचा अड्डा बनला आहे, तसेच फेरीवाल्यांच्या बस्तानामुळे पादचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने २२ जुलै रोजी प्रसिद्ध केले होते.
महापालिकेच्या आर/दक्षिण विभागातर्फे स्कायवॉकची पाहणी केली असता, कांदिवली रेल्वे स्थानकाजवळील सरकता जिना चालू स्थितीत आहे. याशिवाय, आकुर्ली रोड, पश्चिम द्रुतगती मार्गाजवळील सरकत्या जिन्याच्या पीटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तो बंद होता. तो दुरुस्त करण्यात आला आहे, तसेच स्कायवॉक फेरीवाल्यांविरुद्ध अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करून, त्यांचे साहित्य पालिकेने जप्त केले आहे. स्कायवॉकवरून बेघरांना हटविण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या आर/दक्षिण विभागाने सांगितली.