Join us

दोन दिवसांआधी शिक्षकांना पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 3:48 AM

मुंबई बँकेकडे पगारपत्रके जमा करणा-या २९१ शाळांतील सुमारे ६ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचा पगार बँकेने त्यांच्या खात्यात दोन दिवसांआधीच जमा केल्याचा दावा

मुंबई : मुंबई बँकेकडे पगारपत्रके जमा करणा-या २९१ शाळांतील सुमारे ६ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचा पगार बँकेने त्यांच्या खात्यात दोन दिवसांआधीच जमा केल्याचा दावा केला आहे. बँकेच्या कर्मचारी आणि अधिका-यांनी रविवारी सुटीच्या दिवशी काम करत शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा शब्द पाळल्याचे मुंबई बँकेने स्पष्ट केले आहे.दर महिन्याच्या १ तारखेला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे पगार खात्यात जमा करण्याची खात्री तावडे यांनी दिली होती. ती पूर्ण करण्यासाठी बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मुंबई बँकेचे अधिकारी व कर्मचारी काम करताना दिसले. शासनाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई बँकेत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची खाती उघडण्याचे काम वेगाने सुरू असून आतापर्यंत केवायसी कागदपत्रांसह सुमारे १२ हजार ५०० खाती उघडण्यात आली आहेत. शिक्षकांना वेळेत पगार देता यावा, यासाठी बँकेने खाती उघडण्याचे काम रविवारीसुद्धा सुरूच ठेवले होते.या कामाचा आढावा घेऊन कर्मचाºयांना मार्गदर्शन करण्यासाठी बँकेचे अध्यक्ष आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह बँकेचे दादर विभागीय अध्यक्ष नितीन बनकर, चेंबूर विभागीय अध्यक्ष अनिल गजरे आणि सांताक्रूझ विभागीय अध्यक्ष आनंदराव गोळे रविवारी उपस्थित होते. बँकेकडे अर्ज करणाºया सर्व शिक्षकांची खाती उघडण्याचे काम जलदगतीने पूर्ण केले जाईल, अशी माहिती बँकेचे सरव्यवस्थापक डी.एस. कदम यांनी दिली. तरी शाळांनी लवकरात लवकर खाती उघडून आपली पगारपत्रके बँकेकडे जमा करावीत, असे आवाहनही कदम यांनी केले आहे.