दरेकरांच्या उमेदवारीवरून मुंबई भाजपात नाराजी
By admin | Published: May 31, 2016 03:32 AM2016-05-31T03:32:42+5:302016-05-31T03:32:42+5:30
भाजपाने विधान परिषदेसाठी जाहीर केलेल्या यादीत प्रवीण दरेकर यांचा समावेश केल्याने मुंबई भाजपातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे
मुंबई : भाजपाने विधान परिषदेसाठी जाहीर केलेल्या यादीत प्रवीण दरेकर यांचा समावेश केल्याने मुंबई भाजपातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून भाजपात दाखल झालेल्या दरेकरांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास सुरू आहे.
भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या प्रवीण दरेकरांच्या उमेदवारीमुळे पक्षाच्या प्रतिमेला जबर धक्का बसला आहे. पार्टी विथ डिफरन्स ही भाजपाची ओळख आहे. मात्र, भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या आणि अलीकडेच पक्षात दाखल झालेल्या दरेकरांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आल्याने ही ओळखच पुसली जाण्याचा धोका आहे. भाजपा नेतृत्वाने आपल्या या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी मुंबई भाजपाचे सचिव विवेकानंद गुप्ता यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीत दरेकर यांना शिवसेना उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पक्षांतर्गत कारभारावर नाराजी व्यक्त करत दरेकरांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. पुढे त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांच्या भाजपा प्रवेशावरूनही पक्षातून नाराजीचा सूर व्यक्त झाला होता. भाजपा प्रवेशावेळी त्यांच्याकडे मुंबई उपाध्यक्षपद सोपविण्यात आले. विशेष म्हणजे भाजपानेच निवडणुकीपूर्वी दरेकर यांच्या मुंबै बँकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचारात आणला होता. दरम्यान, दरेकरांच्या उमेदवारीचा निषेध म्हणून मुुंबै बँकेचे खातेधारकांनी निषेध मार्च काढण्याचा इशारा दिला आहे.