धाडसाने केले जाणारे नाटक म्हणजे प्रायोगिक नाटक - चं. प्र. देशपांडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 02:02 AM2019-06-04T02:02:06+5:302019-06-04T02:02:12+5:30

शिवाजी मंदिरात सोमवारी पूर्ण दिवस मराठी नाटक समूहातर्फे प्रायोगिक नाटक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

A daring drama is an experimental play - Q. Deshpande | धाडसाने केले जाणारे नाटक म्हणजे प्रायोगिक नाटक - चं. प्र. देशपांडे

धाडसाने केले जाणारे नाटक म्हणजे प्रायोगिक नाटक - चं. प्र. देशपांडे

Next

मुंबई : प्रायोगिक नाटकात चांगली मूल्ये असतात. जगणे समजून घेण्याची प्रक्रिया प्रायोगिक नाटक शिकवते. प्रायोगिक नाटके आवर्जून बघितली गेली पाहिजेत. प्रेक्षकांच्या सवयीबाह्य किंवा सवयींची फिकीर न करता धाडसाने केले जाणारे नाटक म्हणजे प्रायोगिक नाटक होय. अनेकदा काही अपेक्षा कलावंतांवर लादल्या जातात. पण जे कलावंत स्वत:च्या आकलन प्रक्रियेला महत्त्व देतात; ते दबाव झुगारून देऊ शकतात, असे भाष्य ज्येष्ठ प्रायोगिक नाटककार चं. प्र. देशपांडे यांनी केले.

मराठी नाटक समूह, प्रशांत दामले फॅन फाउंडेशन आणि श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ (ट्रस्ट), मुंबई यांच्या सहयोगाने दिल्या जाणाऱ्या नाट्यक्षेत्रातील पुरस्कार प्रदान सोहळ्यात, चं. प्र. देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिवाजी मंदिरात सोमवारी पूर्ण दिवस मराठी नाटक समूहातर्फे प्रायोगिक नाटक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात रंगभूमीसाठी बहुमोल योगदान देणाºया रंगकर्मींचा सन्मान, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक व या सोहळ्याचे अध्यक्ष प्रा. वामन केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आला. यात, ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत काळे यांना प्रदीर्घ योगदान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच, ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांना प्र. ल. मयेकर स्मृती पुरस्कार आणि ज्येष्ठ अभिनेत्री निर्मिती सावंत यांना शरद तळवलकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रकृती अस्वस्थ असल्याने या सोहळ्याला उपस्थित राहू न शकलेल्या, बालरंगभूमीच्या ज्येष्ठ दिग्दर्शिका विद्या पटवर्धन यांना दुपारी त्यांच्या निवासस्थानी जाऊन आयोजकांनी प्रदीर्घ योगदान पुरस्कार प्रदान केला.

या सोहळ्यात बोलताना प्रा. वामन केंद्रे म्हणाले, मराठी रंगभूमी आंतरराष्ट्रीय स्तरावर कधी पोहोचणार, असा प्रश्न उपस्थित केला. मराठी नाटकांची समृद्धी महाराष्ट्राच्या परिघाबाहेर मांडली जाण्याची गरज आहे़ त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. जागतिक मंचावर मराठी रंगभूमीने आपले अस्तित्व सिद्ध करणे गरजेचे आहे. वर्धा येथे एॅग्रो थिएटरची संकल्पना राबविणारे प्रायोगिक रंगकर्मी हरीश इथापे आणि पुणे येथे इंटिमेट थिएटर संकल्पनेचा प्रसार करणारे प्रायोगिक रंगकर्मी प्रदीप वैद्य यांना या सोहळ्यात विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवाजी मंदिरामध्ये पूर्ण दिवस आयोजित या सोहळ्यात कल्याणच्या संजीवनी सांस्कृतिक मंडळाचे मिशन ५९, गोव्याच्या हंस संगीत मंडळींचे अव्याहत आणि मुंबईच्या माध्यम कलामंच या संस्थेच्या खगनिग्रह या नाटकांचे प्रयोग सादर करण्यात आले.

Web Title: A daring drama is an experimental play - Q. Deshpande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.