वज्रेश्वरी : तालुक्यातील बहुचर्चित पहारे गावामधील एकमेव ट्रान्सफॉर्मर गेल्या १० दिवसांपासून बंद पडल्याने संपूर्ण गाव अंधकारमय झाले आहे. परंतु, आजतागायत महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.हा ट्रान्सफॉर्मर बंद पडल्याने ग्रामस्थ, विद्यार्थी, शेतकरी यांना मोठे नुकसान होऊन त्रास सहन करावा लागत आहे. गावातील पाणीपुरवठा योजनाही याच ट्रान्सफॉर्मरवर असल्याने तो १० दिवसांपासून ठप्प झाला आहे. यामुळे महिलांना गावापासून दूर अंतरावरून पाणी आणावे लागत असल्याने त्यांच्यामध्ये संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थिवर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना शेतीला विजेअभावी पाणीपुरवठा करता येत नसल्याने त्यांचे पीक संकटात सापडले आहे. विद्युत मंडळाच्या अधिकाऱ्यांनी फक्त पाहणीव्यतिरिक्त काहीही उपाययोजना केलेली नाही.दरम्यान, येथील विद्युततारा, पोल हे सुमारे ५० वर्षांपासूनचे असल्याने त्या नेहमी तुटून पडतात. पोल गंजल्याने ते पडू नये म्हणून टेकू लावण्यात आले आहेत. यामुळे या जीर्ण तारा विद्युतपुरवठा सुरू असताना पडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याविषयी आणि उपाययोजना करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी विद्युत मंडळाकडे लेखी पाठपुरावा करूनही अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर, नवीन मीटरसाठी प्रलंबित अर्ज मंजूर करणे आणि एकमेव असलेल्या ट्रान्सफॉर्मवरची क्षमता वाढविणे या मागण्या आजतागायत प्रलंबित आहेत. (वार्ताहर)
भिवंडीतील पहारे गाव १० दिवसांपासून अंधारात
By admin | Published: December 03, 2014 11:43 PM