कोरोनामुळे अंध व्यक्तींसमोर अंधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:06 AM2021-05-29T04:06:08+5:302021-05-29T04:06:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांसमोर विविध संकटे उभी राहिली आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांसमोर विविध संकटे उभी राहिली आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर ज्यांचे हातावर पोट आहे अशा लोकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. परंतु, आपल्या अंधत्वावर मात करत मेहनत करून जिद्दीने जगणाऱ्या अंध व्यक्तींनाही कोरोनामुळे जबर फटका बसला आहे.
आज मुंबई व आसपासच्या परिसरातील अंध व्यक्तींसमोर जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे तर कित्येकजण दोनवेळच्या जेवणासाठी तळमळ करत आहेत. अंध व्यक्तींच्या मदतीसाठी या लॉकडाऊनमध्ये विविध संघटना पुढे सरसावल्या असल्या तरीदेखील घरभाडे, औषधोपचार तसेच इतर किरकोळ खर्चाचे संकट त्यांच्यासमोर आ वासून उभे आहे. लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर शुकशुकाट असून, बंद असलेली लोकल तसेच इतर कठोर नियम यामुळे आम्ही आता जगायचे कसे, असा प्रश्न अंध व्यक्ती विचारत आहेत.
शहरात अंध पॉझिटिव्ह व्यक्ती
मुंबईत झालेल्या कोरोनाच्या प्रकोपामुळे आत्तापर्यंत नऊशेहून अधिक अंध व्यक्तींना कोरोनाची लागण झाली. या व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्यांसाठी अंध नागरिकांसाठी काम करणाऱ्या संस्थादेखील या काळात त्यांच्या मदतीला धावून आल्या.
आधारही एकमेकांचाच
लक्ष्मण चव्हाण - मी एका इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या शोरूममध्ये काम करत होतो. लॉकडाऊन दरम्यान माझी नोकरी गेली. आर्थिक परिस्थिती बिघडल्यामुळे माझ्या घराचे तीन महिन्यांचे भाडे थकीत आहे. तसेच मुलाच्या शाळेची फीदेखील भरायची आहे. माझी पत्नीही अंध असल्याने आम्हाला कोणाचाही आधार नाही. यासाठी आता मी मदतीची अपेक्षा करत आहे.
यशवंत पांचाळ - मी बासरीवादक असल्याने काही ठिकाणी ऑर्केस्ट्रामध्ये वाजविण्यास जात असे. त्याचप्रमाणे घरात बासरीचे क्लासेसही घेत असे. मात्र, आता लॉकडाऊनमुळे सर्वकाही ठप्प झाल्याने माझ्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे.
नीलिमा ठाकूर - मी लोकलमध्ये दररोज कटलरी व मेकअपच्या वस्तू विकण्यासाठी जात असे. लोकल बंद असल्याने आता उत्पन्नाचे साधन पूर्णतः बंद झाले आहे. यामुळे कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
पोन्नलगर देवेंद्र (अध्यक्ष, नयन फाऊंडेशन) - मुंबई व आसपासच्या परिसरातील जास्तीत जास्त अंध व्यक्ती या लोकलमध्ये किंवा इतर गर्दीच्या ठिकाणी विविध छोट्या-मोठ्या वस्तू विकण्याचे काम करतात. लॉकडाऊनमुळे त्यांचा हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. यापैकी अनेकजण भाड्याच्या खोलीत राहतात. काही संस्था अशा व्यक्तींच्या मदतीला धावून आल्या. आम्हीही आमच्या संस्थेतर्फे लॉकडाऊन काळात अंध बांधवांसाठी जेवढी मदत शक्य आहे, तेवढी करत आहोत.