रात्रीचा अंधार, घरांवर माती अन् वरून पाऊस-वारा, ग्रामविकासमंत्र्यांच्या लेखणीतून....
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 10:26 AM2023-07-21T10:26:49+5:302023-07-21T10:29:45+5:30
ग्रामविकासमंत्र्यांनी सांगितला बचावकार्याचा थरार
गिरीश महाजन
ग्रामविकास मंत्री लाेकमतसाठी लिहितात...
मुंबई : सर्वत्र अंधार. पाऊस सुरूच होता. वरून जोरात वाराही वाहत होता. कुठल्याही यंत्राची मदत घेता येत नव्हती. त्यामुळे माणसांच्याच मदतीने बचावकार्य सुरू होते... इर्शाळवाडीत दरड कोसळल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहचलाे. इर्शाळ गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीत दरड कोसळल्याचे समजताच तातडीने घटनास्थळाकडे रवाना झालाे. मध्यरात्री तीन वाजले हाेते. सोबत आमदार महेश बालदी होते.
अंधार असल्याने मोबाइलच्या बॅटरीच्या उजेडात वाट काढत आम्ही घटनास्थळ गाठले. खाली पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दादा भुसे उपस्थित होते. सीईओ, पोलिस अधीक्षक, एसडीओ, तहसीलदार आदी अधिकारी व कर्मचारीही होते. तुफान पाऊस कोसळत होता. सोबत जोराचा वाराही होता. सर्वत्र अंधाराचेच साम्राज्य होते. डोंगराळ भाग, घटनास्थळी पायी जावे लागणार होते. जाण्याचा रस्ता केवळ तीन फुटाचा. बाजुला खोल दरी, जोराचा वारा आणि वरून पाऊस. पायी चालणेही कठीण जात होते. अचानक कुठे दरड कोसळेल, याचा नेम नव्हता. निघत असतानाच पोलिसांनी धोक्याची सूचना दिली. अचानक दरड कोसळू शकते, असा इशाराही दिला. जवळच्या गावांमधून ५० ते ६० गावकऱ्यांची टीम मदतीकरिता जमवली. तोपर्यंत पहाटेचे पाच वाजले होते.
एनडीआरएफची टीम आमच्या मदतीसाठी पोहोचली होती. डोंगराळ भाग असल्यामुळे बचावकार्यासाठी जेसीबी वगैरे यंत्रांचा वापर शक्यच नव्हता. खराब हवामान व लँडिगकरिता जागा नसल्यामुळे हेलिकॉप्टरची मदत घेता येत नव्हती. शेवटी अत्याधुनिक तांत्रिक मदतीविना, बचावकार्य सुरू केले.
मातीचा ढिगारा, राडारोडा उपसण्याच्या कामी सर्वजण लागले. पाऊस सुरूच होता. त्यामुळे जेवढा ढिगारा उपसत होतो, त्यापेक्षा जास्त वरून पुन्हा जमा होत होता. वाटही निसरडी झाल्याने मदतकार्य करणारे घसरून पडत होते. सगळी परिस्थिती हाताबाहेरची होती. साधारणत: २५० लोकवस्तीचा हा पाडा. ६० ते ७० व्यक्ती रोजगारासाठी पाड्याच्या बाहेर असल्याची माहिती आहे. त्यामुळे सुदैवाने ते या दुर्घटनेतून बचावले. सकाळपर्यंत आजूबाजूच्या गावांतील गावकरी घटनास्थळी जमले. त्यांनीही मदतीचा हात पुढे केला. प्रत्येकजण आप्त - स्वकियांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता.
एकाच ठिकाणी दफन
बचावकार्य सुरू असताना नऊ जणांचे मृतदेह हाती लागले. दफनविधी करण्याचे ठरल्यानंतर खड्डे खोदण्यात आले. पाऊस सुरू असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी जमा होत होते. ते पाणी आम्ही उपसत होतो. या कठीण प्रसंगात काळजावर दगड ठेवून त्या मृतदेहांचे दफन केले.
शाळेत झोपलेली सहा मुले सुरक्षित
गावातील शाळेच्या इमारतीमध्ये गावातील सहा मुले झोपली होती. सुदैवाने ती या दुर्घटनेमधून सुरक्षित राहिली. दरड कोसळण्याच्या आवाजामुळे जाग आल्याने या मुलांनी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या जवळच्या लोकांना कळवले. त्यामुळे मदतीसाठी अनेकजण धावून आले.