पनवेलच्या मानबिंदूवर अंधार

By admin | Published: May 24, 2014 12:59 AM2014-05-24T00:59:17+5:302014-05-24T00:59:17+5:30

पनवेल शहराचा मानबिंदू समजल्या जाणार्‍या मुंबई - गोवा महामार्गावरील पनवेल येथील इलेव्हेटेड रोडवरील पथदिवे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत

Darkness on Panvel's main point | पनवेलच्या मानबिंदूवर अंधार

पनवेलच्या मानबिंदूवर अंधार

Next

प्रशांत शेडगे, पनवेल - पनवेल शहराचा मानबिंदू समजल्या जाणार्‍या मुंबई - गोवा महामार्गावरील पनवेल येथील इलेव्हेटेड रोडवरील पथदिवे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. त्यामुळे हा पूल अंधारात असून बिल थकल्याने महावितरणने वीज पुरवठाही खंडित केला आहे. त्याचा फटका सिग्नल यंत्रणेला बसला आहे. वीज बिल भरण्याकरिता रस्ते विकास महामंडळाकडे तरतूद नसल्याने दिवे पेटत नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पनवेल नगरपालिकेनेही हात झटकल्याने परिस्थिती अतिशय बिकट बनली असून यामुळे अपघातातही वाढ झाली आहे. इलेव्हेटेड रोड होण्याच्या अगोदर वाहनांनी वर्दळ होत असल्याने पनवेल शहरानजीक वाहतूक कोंडी होत असे. स्थानिक वाहने या कोंडीत तासन्तास अडकून पडत असत. याव्यतिरिक्त पनवेल बसस्थानकावर येणार्‍या जाणार्‍या एसटी बसनाही याचा फटका बसत होता. अरुंद रस्ते, वाहनांची वाढती संख्या, त्याचबरोबर पनवेल शहरात नागरीकरणाचा वाढलेला आलेख यामुळे पनवेल शहराचा श्वास कायम कोंडलेला असायचा. हा प्रश्न मार्गी लावण्याकरिता शहरालगत उड्डाणपूल बांधावा अशी मागणी प्रशांत ठाकूर नगराध्यक्ष असताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे केली होती. देशमुख यांनी त्याच दिवशी या ठिकाणी इलेव्हेटेड रोड बांधण्याची घोषणा केली. काही महिन्यातच याबाबत निर्णय होवून सर्व्हे करण्यात आला. विलासराव अध्यक्ष असलेल्या एमएमआरडीने याकरिता निधी उपलब्ध करून देवून रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग केला. तीन वर्षात या पुलाचे काम जेएमसी या कंपनीने पूर्ण करून गेल्या वर्षी वाहनांकरिता खुला करण्यात आला. गार्डन हॉटेल ते तक्का नाका असा दीड किमीच्या या पुलावर आणि खालीही ठेकेदाराने पथदिवे बसवून दिले. त्याकरिता महावितरणकडून नियमानुसार वीज मीटर घेतले असून त्यांनी ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणाही बसवून दिली. काही दिवस हे दिवे पेटले मात्र त्यानंतर ते दिवे बंद आहे. सुमारे एक लाखांपेक्षा जास्त वीजबिल थकले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महावितरणने वीजपुरवठा खंडित करूनही मीटरही काढून नेले असल्याने सर्व पथदिवे बंद आहेत. रात्रीच्या वेळी पुलावर अंधाराचे जाळे पसरत आहे. काही ठिकाणी स्पीड ब्रेकर तर उताराच्या ठिकाणी रम्बलरही आहेत. अंधार असल्याने ते दिसत नसल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे दररोज लहान मोठे अपघात घडून वाहनचालकांची गैरसोय होत आहे. विशेषत: दुचाकीस्वारांची कुचंबणा होते. पुलाच्या खाली पथदिवे बंद असल्याने समोरचे काहीही दिसत नाही. या मार्गावर एकूण २00 वीजखांब असून ४00 वीजदिवे आहेत, मात्र यातील एकही दिवा सध्या चालेनासा झाला आहे. चरस, गांजा, गर्द ओढण्याचा हा अड्डा झाला असून महिलांना चालणेही मुश्किल झाले आहे, तसेच सोनसाखळी चोर फायदा घेवून याच ठिकाणी गायब होत आहे. पथदिवे आणि सिग्नल यंत्रणा सुरू व्हावी याकरिता पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी स्वत: लक्ष घातले असून त्यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप गोरे यांना संबंधित यंत्रणात समन्वय साधून सूचना केल्या आहेत. त्यानुसार गोरे यांचा पाठपुरावा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे.

Web Title: Darkness on Panvel's main point

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.