Join us

अंधेरीत नव्याने बांधलेल्या काँक्रीटच्या रस्त्याला तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 2:24 AM

पालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह : हवामान बदलामुळे तडे जात असल्याचे प्रशासनाचे मत

मुंबई : अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी येथे नव्याने बांधलेल्या काँक्रीटच्या रस्त्यांना जागोजागी तडे गेले आहेत, तसेच अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरील काँक्रीट कमकुवत झाले आहे. महापालिका पावसाळा सुरू होण्याआधी रस्त्यांची दुरुस्ती करते. त्यासाठी डांबरीकरणाऐवजी काँक्रीटच्या रस्त्यांना प्रथम स्थान देऊन कोट्यवधी रुपये खर्च करून कामे केली जातात, परंतु एवढा पैसा खर्च करून काँक्रीटच्या रस्त्याला तडे कसे जातात, असा सवाल स्थानिकांनी केला आहे.

मनसे अंधेरी पूर्व विधानसभा विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांनी सांगितले की, पालिकेकडून डांबरीकरणाऐवजी काँक्रीटचे रस्ते बनविण्याची मागणी होत होती. मात्र, नियोजनशून्य कारभारामुळे जमिनीतील नळवाहिनी, विद्युत व दूरध्वनी केबल आदींचा अडथळा आला. यात काही महिने काम रखडले. नव्याने बनविलेल्या रस्त्यांना तडे गेले आहेत. काही ठिकाणी रस्त्याचा मोजकाच भाग पूर्ण करून पुढील रस्त्याचे काम अर्धवट ठेवले आहे, तसेच काही ठिकाणी काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्याच्या बाजूची कामेही झालेली नाहीत. अशा ठेकेदारांवर कारवाई करून रस्त्यांची दुरुस्ती त्वरित सुरू करावी.रस्ते (पश्चिम उपनगरे), उपप्रमुख अभियंता व्ही. कल्याणकर हे याबाबत म्हणाले की, नव्या काँक्रीटीकरणाच्या रस्त्याला हवेच्या दाबामुळेदेखील तडे पडतात. हे तडे रस्त्यांच्या वरच्या बाजूला पडतात, तसेच हवामानाच्या बदलामुळेही रस्त्यांना तडे जातात. वर्षाच्या आत तडे गेल्यावर त्यांची पुन्हा दुरुस्ती होते. रस्त्यांचे काम करताना तो रस्ता हलला नाही पाहिजे. रस्त्यांच्या बाजूने अवजड वाहने गेली, तर त्यांच्या वजनाने तो रस्ता हलतो. त्यामुळे रस्त्याच्या वरच्या थरावर तडे जातात.या रस्त्यांची कामे अर्धवटअंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी, क्रॉस रोड, रेडिसनस व तुंगा इंटरनॅशनल हॉटेलच्या मधला रस्ता, एमआयडीसी रोड क्रमांक १ येथील शांती इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटसजवळ, एमआयडीसी रोड क्रमांक २ जवळील एफएफसी बारोमास प्रायव्हेट लिमिटेड, कृष्णा झुणकाभाकरच्या मधला रस्ता, एमआयडीसी रोड क्रमांक ३ येथील सिंधुरत्न झुणका-भाकर केंद्र आणि हॉटेल गाजलीच्या मधला रस्ता आणि एमआयडीसी रोड क्रमांक सातजवळील आकृती सेंटर पॉइंट.

टॅग्स :रस्ते सुरक्षामुंबई