Join us

दिव्याखाली अंधार, महापालिकेने शौचालयात ठेवली कागदपत्रे, दस्तऐवज, कार्यादेश, अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:15 AM

दिव्याखाली अंधार, महापालिकेने शौचालयात ठेवली कागदपत्रे, दस्तऐवज, कार्यादेश, अहवाललोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घाटकोपर पूर्व येथील पंतनगर गॅरेज ...

दिव्याखाली अंधार, महापालिकेने शौचालयात ठेवली कागदपत्रे, दस्तऐवज, कार्यादेश, अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : घाटकोपर पूर्व येथील पंतनगर गॅरेज बिल्डिंग या ठिकाणी महानगरपालिकेच्या रस्ते विभाग, पर्जन्य जलवाहिन्या विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग व इतर विभाग यांच्या उपप्रमुख अभियंता पूर्व उपनगरे यांची कार्यालये आहेत. त्यामुळे या इमारतीत नागरिकांची तसेच कंत्राटदारांची सतत वर्दळ असते. मात्र या इमारतीमध्ये कागदपत्रे, दस्तऐवज, कार्यादेश, अहवाल रहदारीच्या जिन्यावर, शौचालयात, इमारतीच्या पॅसेजमध्ये ठेवलेली आढळून येत आहेत. परिणामी एखादी दुर्घटना झाल्यास ही कागदपत्रे नष्ट होतील, अशी भीती व्यक्त होत आहे.

मुंबई महापालिका स्वच्छ अभियानाच्या नावाखाली मुंबई स्वच्छ ठेवत असताना दुसरीकडे महापालिकेच्या कार्यालयात अशा प्रकारे कागदपत्रे ठेवली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अखिल भारतीय माहिती अधिकार कार्यकर्ते महासंघाचे अध्यक्ष अंकुश कुराडे यांनी याबाबत सांगितले की, मी स्वतः येथे जाऊन आलो आहे. येथे ही कागदपत्रे अडचणीच्या जागी ठेवल्याने, त्यांच्या पेट्यांमुळे नागरिकांना चालण्यास त्रास होत आहे. जर अनावधानाने इमारतीस आग लागल्यास हीच कागदपत्रे ज्वलनशील इंधनाचे कार्य करतील. ही बाब संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र अयोग्य नियोजन, प्रशासकीय दुर्लक्ष यामुळे अधिकारी हतबल आहेत, असे उत्तर मिळाले. कागदपत्रे निष्काळजीपणे शौचालयात, जिन्यावर ठेवण्यात येऊ नयेत, असे त्यांचे म्हणणे आहे.