मुंबई : महाराष्ट्रात दर १२ मैलांवर भाषा बदलते असे म्हणतात. याच विविधांगी संस्कृती, संगीत यांना एका व्यासपीठावर सादर करणाऱ्या ‘महानाट्या’ची घोषणा नुकतीच मुंबईत करण्यात आली. अरविंद जोग फाउंडेशनतर्फे पार पडणाऱ्या महानाट्यात ‘क्रिएटिव्ह टीम’ म्हणून विजय केंकरे, पुष्कर श्रोती, वैजयंती आपटे, फुलवा खामकर अशा दिग्गजांची फौज काम पाहणार आहे. हे महानाट्य वर्षाअखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.राज्यात विविध भाषा, संगीत, साहित्य यांचे स्वतंत्र कलाविष्कार पाहायला मिळतात. तर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, विदर्भ, मराठवाडा येथील भाषावार संस्कृतीमुळे महाराष्ट्राच्या विविधतेतील एकात्मतेचे दर्शन होते. मराठी कलाकारांनी केवळ महाराष्ट्र नव्हे, तर देशाला एक राष्ट्र म्हणून घडवले या सगळ्याची गाथा म्हणजे महानाट्य आहे. साहित्यिकांपासून ते शास्त्रज्ञ आणि अभिनेत्यांपासून ते समाजसेवक यांचा ‘कोलाज’ म्हणजे ‘महानाट्य’ असल्याचे मत प्रसिद्ध संगीतकार विश्वजीत जोशी यांनी व्यक्त केले.परदेशात अशा स्वरूपाची महानाट्ये होतात. मात्र राज्यात अशा प्रकारचे सादरीकरण होत नाही. संस्कृतीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने साकारले जाणारे हे महानाट्य भव्यदिव्य असल्याचा विश्वास दिग्दर्शक विजय केंकरे यांनी व्यक्त केला आहे. दिग्गज लेखकांच्या लेखणीतून महानाट्य साकारले जाणार आहे. राज्याचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील प्रवास अधोरेखित करणारा हा कार्यक्रम असल्याचे वैजयंती आपटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)महानाट्य म्हणजे काय?व्यक्ती अथवा स्थान किंवा प्रदेश यांच्यावर दृकश्राव्य पद्धतीने भाष्य करणाऱ्या सादरीकरणाला ‘महानाट्य’ असे म्हटले जाते. यात शेकडो कलाकारांचा समावेश असतो. यातून व्यक्तीचा जीवनप्रवास, स्थान किंवा प्रदेशाचा भूत ते वर्तमान अशा विषयांचे प्रभावीपणे नाट्य, नृत्य आणि संगीताच्या आधारे प्रभावीपणे सादरीकरण होते. छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते जर्मन बेकरी बॉम्बस्फोटापर्यंतच्या महाराष्ट्रावर प्रकाश टाकणारे पुणे येथे सादर झालेले ‘भारत माझा, महाराष्ट्र माझा’, आणि मुंबईच्या गेटवेवर सादर झालेले ६०० कलाकारांचे ‘मी यशवंत’ या महानाट्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
‘महानाट्या’तून वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन
By admin | Published: February 12, 2017 4:26 AM