मुंबई: तब्बल आठ महिन्यांच्या कारावासानंतर जामिनावर सुटका झालेल्या सराईत गुंडाने जल्लोष साजरा करण्यासाठी बीएमडब्ल्यू गाडीतून मिरवणूक काढली, त्याच्या पंटरांनी मोठ्या आवाजात डीजे लावला, फटाकेही फोडले. मात्र, हा सगळा तामझाम गुंडाच्या अंगाशी आला आणि त्याची रवानगी पुन्हा तुरुंगात झाली. हा किस्सा घडला कुलाब्यात...
दरवेझ मोहम्मद सय्यद ऊर्फ दरवेझभाई हा कुलाब्यात गॅरेज चालवतो. गेल्या वर्षी त्याने क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीवर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला केला होता. त्यामुळे त्याची रवानगी तुरुंगात झाली. अटकेनंतर दरवेझभाईची रवानगी आर्थर रोड कारागृहात करण्यात आली. त्यानंतर आठ महिन्यांनी जामिनावर त्याची सुटका झाली.
२८ जुलै रोजी दरवेझ व त्याच्या पंटर्सनी सुटकेचा जल्लोष साजरा केला. मोठ्या आवाजात गाणी वाजवत, घोषणाबाजी करत आणि फटाके फोडत दरवेझचे स्वागत करण्यात आले. जल्लोषासाठी दरवेझने त्याच्या एका क्लाएंटची बीएमडब्ल्यू कार वापरली.
एसबीएस रोडवरून निघालेल्या मिरवणुकीत बीएमडब्ल्यूच्या सनरुफमध्ये उभे राहून हातात सिगरेट घेऊन दरवेझ सगळ्यांना हात उंचावत अभिवादन करत होता. हे सर्व त्याचे साथीदार उत्साहाने कॅमेराबंद करत होते. या सर्व उत्साहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला.
व्हिडीओ व्हायरल होताच कुलाबा पोलिसांनी रॅली काढून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी ४ ऑगस्ट रोजी दरवेझसह शाहबाज सय्यद (२८), दिलशाद अब्दुल रशीद शेख (२४) आणि कल्लू उर्फ राज (२१) आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.