लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: उद्धवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानात सायंकाळी पाच वाजता, तर शिंदेसेनेचा मेळावा आझाद मैदान येथे साडेपाच वाजता होत आहे. या मेळाव्यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे. आझाद मैदानात होणाऱ्या मेळाव्याला एक ते दीड लाख लोक उपस्थित राहतील, असा दावा शिंदेसेनेने केला आहे, तर शिवतीर्थावरील मेळावा गर्दीचा उच्चांक मोडणारा असेल, असा विश्वास उद्धवसेनेने व्यक्त केला आहे.
मेळाव्यापूर्वी उद्धवसेनेने एक टीझर जारी करून वातावरण निर्मिती केली आहे. शिवाजी पार्क येथील मेळाव्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. मैदानावर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.
त्यासोबतच साधारण दीड ते दोन लाख शिवसैनिक बसतील, अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. विधानसभेसाठी ठाकरे यंदाच्या मेळाव्यातून काय घोषणा करणार याकडे लक्ष लागले आहे. यासोबतच महत्त्वाचे पक्षप्रवेश यावेळी होतील, अशी माहिती सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
परतीच्या पावसाचे विघ्न? आझाद मैदान व शिवाजी पार्क येथे हे दोन्ही मेळावे होत आहेत. परंतु, गुरुवारी झालेल्या पावसामुळे तिथे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे. दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. मात्र, मेळाव्यावर परतीच्या पावसाचे विघ्न निर्माण होते की काय? याची चिंता आहे.
राज ठाकरे यांचीही तोफ धडाडणार ‘पॉडकास्ट’वरून
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दसऱ्यानिमित्त शनिवारी सकाळी जनतेशी संवाद साधणार आहेत. पहिल्यांदाच ते पॉडकास्टवरून बोलणार आहेत. शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्याआधी ते बोलणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती टिकवायची वेळ आलेली आहे आणि ती मनसे टिकवणार. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मनसे ‘अभी नही तो कभी नही‘ या थीमवर कामाला लागली आहे, असे देशपांडे यांनी सांगितले.