मुंबई - शिवसेनेची ओळख असलेल्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा करणारा शिंदे गट आमने सामने आले होते. दरम्यान, या प्रकरणात मुंबई हायकोर्टाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने निकाल देत शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र या दसरा मेळाव्यावरून दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात आता शिंदे गटाच्या बाजूने भाजपानेही खिंड लढवण्यास सुरुवात केली आहे.
यंदाच्या दसऱ्याला बीकेसीवर दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कवर 'हसरा मेळावा' आयोजित होईल, अशा शब्दात भाजपाने उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी अशा आशयाचे ट्विट केले आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी कोर्टाने उद्धव ठाकरे यांना परवानगी दिली असली तरी या मेळाव्यावरून सुरू झालेला राजकीय वाद एवढ्यावरच थांबण्याची चिन्हे दिसत नाही आहेत.
दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेने मुंबई महानगरपालिकेकडे अर्ज केला होता. त्यानंतर शिंदेगटानेही दसरा मेळावा शिवाजी पार्कवर आयोजित करण्यासाठी अर्ज केला होता. अखेर कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत मुंबई महानगरपालिकेने दोघांनाही परवानगी नाकारली होती. त्यानंतर शिवसेनेने मुंबई हायकोर्टात धाव घेत दाद मागितली होती. अखेरीस या प्रकरणावर सुनावणी घेत मुंबई हायकोर्टाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा आयोजित करण्याची परवानगी दिली होती.