मुंबई - गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा यंदा कोण घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दरवर्षी दसऱ्याला दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मेळावा आयोजित करतात. या मेळाव्याची सर्व शिवसैनिकांना प्रचंड उत्सुकता असते. मात्र यंदाच्या दसरा मेळाव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संघर्ष पेटला आहे. शिंदे गटाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल असे संकेत दिले आहेत. तर, मंत्री गुलाबराव पाटील यांनी दसरा मेळाव्याची तारीखही जाहीर केली आहे.
शिवाजी पार्कवरील मेळाव्याला कुणाची परवानगी मिळते हे पाहणे गरजेचे आहे. शिवाजी पार्कवर मेळावा आयोजित करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून पहिला अर्ज प्राप्त झाला होता. अनिल परब यांनी हा अर्ज दिला. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क उपलब्ध करून द्यावा असा अर्ज केला. परंतु गणेशोत्सवाचं कारण देत महापालिकेने यावर निर्णय घेतला नव्हता. मात्र, आता महापालिकेला या दोन्ही अर्जावर निकाल द्यावा लागणार आहे. त्यामुळे, शिवतिर्थवर दसरा मेळावा नेमकं कोणाचा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता, गुलाबराव पाटील यांनी दसरा मेळाव्याची तारीखही जाहीर केली आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा १०० टक्के होणार असून तो ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे, असेही गुलाबाराव पाटील यांनी स्पष्ट केले. दसरा मेळाव्यासाठीचं ठिकाण अद्याप ठरलेलं नाही, आम्ही शिवाजी पार्क मैदानासाठी परवानगी मागितली आहे. जर परवानगी मिळाली तर तिथंच होईल, नाही मिळाली तर दुसरीकडे होईल. पण मेळावा होणार हे नक्की, असे स्पष्टपणे पाटील यांनी सांगितले.
शिंदे गटातील मंत्र्यांचा महाराष्ट्र दौरा
२० ते ३० सप्टेंबर या कालावधी शिवसेनेचा शिवसंवाद यात्रा दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येणार आहेत. त्यामध्ये, संबंधित जिल्ह्यांचे प्रश्न जाणून घेणे, यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आम्हाला आदेश केले आहेत. एकेका मंत्र्यासोबत ३ ते ४ जिल्हे असून त्यांच्यासमवेत आमदार, खासदार, स्थानिक जिल्हाप्रमुख आणि पदाधिकारी असणार आहेत.