मुंबई - एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. तसेच या दोन्ही गटांकडून आपली शिवसेना हीच खरी शिवसेना असा दावा केला जात आहेत. त्यामुळे शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा यावर्षी दोन ठिकाणी साजरा होणार आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. तर बीकेसी येथील मैदानात शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहेत. दरम्यान, या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने जोरदात तयारी सुरू केली आहेत. तसेच या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून पोस्टरही प्रसिद्ध करण्यात येत आहेत. दरम्यान, दसरा मेळाव्याच्या पहिल्या पोस्टरमधून शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना डिवचले आहे.
दसरा मेळाव्यासाठीचा शिंदे गटाचे पहिले पोस्टर समोर आले आहेत. या पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे फोटो ठळकपणे लावण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचाही फोटो लावण्यात आला आहे. तसेच आम्ही विचारांचे वारसदार असे या पोस्टरवर लिहून शिंदे गटाने उद्धव ठाकरेंना डिवचले आहे. तसेच बाळासाहेब तुमचा वाघ आहे म्हणून हिंदुत्वाला जाग आहे, असा एक बॅनर प्रसिद्ध करत शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चिमटा काढला आहे.
दरम्यान, शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर होणाऱ्या दसरा मेळाव्याकडे अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरु झाली आहे. ठाकरे गटाकडून पक्षातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असून, आजपर्यंत झाला नाही असा दसरा मेळावा भरवण्याकरिता पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे सांगितले जात आहे.
तर शिंदे गटाकडूनही दसरा मेळाव्यासाठी जोरदा मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. ठाकरे गटापेक्षा शिंदे गटाचा दसरा मेळावा मोठा व्हावा, त्याठिकाणी गर्दी व्हावी यासाठी शिंदे गटाकडून मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. त्यादृष्टीने दसरा मेळाव्याला गर्दी करण्यासाठी ठाण्यातील माजी नगरसेवकांना सुचना देण्यात आल्या आहेत. यात प्रत्येक नगरसेवकाला किमान पाच बस घेऊन येण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.