Join us

शिवसेनेला धक्का? कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटासाठी सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 4:56 PM

Maharashtra Political Crisis : महाविकास आघाडीविरोधात भाजपाच्या अंतर्गत बैठकींबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

मुंबई :  मागच्या आठवड्याभर सुरु असलेल्या सत्तासंघर्षाला आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर भाजपाच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचा पाठिंबा काढल्याचं पत्र राज्यपालांना पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे गटाच्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये बैठकींना देखील वेग आला आहे. तसेच महाविकास आघाडीविरोधातभाजपाच्या अंतर्गत बैठकींबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेला खूप मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. 

आज सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाकडून शिवसेना पक्षप्रमुख, राज्य सरकार, विधिमंडळ सचिवालय, केंद्र सरकार यांना ५ दिवसात उत्तर देण्यासाठी नोटीस जारी करण्यात आलेली आहे. जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत १६ आमदारांना आपले उत्तर दाखल करण्याची मुभा सुप्रीम कोर्टाने दिली. ११ जुलैला पुढील सुनावणी होतपर्यंत शिंदे गटातील आमदारांवर कोणतीही कारवाई करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. ११ जुलै ५.३० पर्यंत १६ आमदारांना आपले म्हणणे मांडण्याची मुभा देण्यात आली आहे. 

कोर्टाच्या या निर्णयानंतर भाजपाने आता मैदानात उतरण्यास सुरुवात केली आहे. कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर भाजपाकडून कायदेशीर चाचपणी सुरु करण्यात आली आहे. आज सायंकाळी ५ वाजता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या निवासस्थानी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली आहे. महाविकास आघाडीविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची भाजपाची तयारी असल्याची माहिती समोर येत आहे.

 

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेराज्य सरकारमहाविकास आघाडीभाजपासर्वोच्च न्यायालय