कोकणातील दशावतारही होतोय ‘अपग्रेड’, सुगीचे दिवस येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 02:46 AM2018-09-02T02:46:24+5:302018-09-02T02:46:52+5:30
कानठळ्या बसवणारा मृदंगाचा नाद, हार्मोनियमचे वरच्या पट्टीतले स्वर आणि झांजेचा खणखणाट कानी पडला की आठवण होते ती दशावतारी नाटकांची. कोकणात जत्रेला दशावतारी नाटके सादर करण्याची प्रथा आहे.
- सुहास सूर्यकांत शेलार
कानठळ्या बसवणारा मृदंगाचा नाद, हार्मोनियमचे वरच्या पट्टीतले स्वर आणि झांजेचा खणखणाट कानी पडला की आठवण होते ती दशावतारी नाटकांची. कोकणात जत्रेला दशावतारी नाटके सादर करण्याची प्रथा आहे. आज मनोरंजनाच्या नवनवीन साधनांनी स्पर्धा निर्माण केली आहे. जे चांगले दिसते त्याकडे आकर्षित होण्याचा ट्रेंड वाढला आहे. त्यामुळे पूर्वापार चालत आलेल्या नाट्यपरंपरेला छेद न देता काहीतरी नवे सादर करण्याचे आव्हान नेहमीच दशावतारी कलाकारांसमोर होते. ते आव्हान लीलया पेलत या कलाकारांनी आजच्या गॅझेटच्या जमान्यातील तरुण पिढीलाही दशावताराच्या मोहात पाडले. हे सारे शक्य झाले ते केवळ युवा कलाकार दशावतारात येऊ लागल्यामुळेच!
दशावतार हा नाट्यप्रकार लिखित स्वरूपात आढळत नाही. ऐकीव कथेच्या आधारे कलाकार स्वयंस्फूर्तीने भाषणे करतात. त्यामुळे या नाटकातला विषय प्रत्येकवेळी वेगळा असला तरी कलाकारांच्या संभाषणात बऱ्याचदा सारखेपणा असतो. शिवाय तीच ती गाणी आणि तंत्रशुद्धतेचा अभाव यामुळे प्रोफेशनलपणा टिकून राहत नाही. दशावतारी नाटकात मोठ्या प्रमाणावर तरुण कलाकार सामील झाल्याने त्यांनी सर्वप्रथम वरील मुद्द्यांचा गांभीर्याने विचार केला. त्यांनी ट्रीक सीन, थ्रीडी लाईट इफेक्ट, मुखवट्यांचा वापर अशा तांत्रिक गोष्टी दशावतारात आणल्या. पौराणिक ग्रंथ तसेच ऐतिहासिक पुस्तकांचा आधार घेत नवनवे नाट्यविषय हाताळले. त्यामुळे दशावतारी नाटकांकडे पाठ फिरवलेले प्रेक्षक पुन्हा परतले.
दशावतारी नाटकांना हायटेक करायचे असल्यास खर्च खूप जास्त आहे. मात्र, इतर लोककलांसारखा दशावतारालाही राजाश्रय प्राप्त झाल्यास ही कलादेखील नवी भरारी घेईल यात शंका नाही. पूर्वी दशावतार हा नाट्यप्रकार केवळ सिंधुदुर्ग जिल्हा किंवा गोव्यापुरताच मर्यादित होता; मात्र आता मुंबईमध्येही बरीच दशावतारी मंडळे स्थापन झाली आहेत. आणि मुख्य म्हणजे या मंडळांत युवा कलाकारांचा भरणा अधिक आहे. हे युवक बरीच मेहनत घेऊन सादरीकरणावर भर देत आहेत. त्यामुळे मुंबईत दशावतारी नाटक पाहण्यासाठी येणाºया प्रेक्षकांची वाढती गर्दी पाहता या लोककलेला येत्या काळात सुगीचे दिवस येणार आहेत हे मात्र नक्की.
दशावतारी नाटकांचा इतिहास
दशावतार ही नाट्यकला कधी आणि कशी अस्तित्वात आली याविषयी फारशी माहिती सापडत नाही. या नाट्यप्रकाराविषयी ऐकीव माहिती अशी की, फार वर्षांपूर्वी कर्नाटक राज्यातून ‘गोरे’ नावाचे ब्राह्मण कोकणात आले होते. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरिता इथल्या स्थानिक जमातींच्या साहाय्याने त्यांनी सुरुवातीला फक्त व्यवसायाच्या दृष्टीने दशावतारी नाटकांची सुरुवात केली. पुढे हळूहळू या नाटकांना संपूर्ण कोकणभर वाव मिळू लागला.
कसे होते सादरीकरण
नाटकाला सुरुवात करण्याअगोदर कलाकार सर्व सहित्याची पूजा करतात (उदा. गणपतीचा मुखवटा, तलवारी, वगैरे) दशावताराची आरती केल्यानंतर प्रत्यक्ष नाटकाला सुरुवात होते. रंगमंचावर विघ्नहर्त्या गणपतीला आवाहन करणारे पद म्हटले जाते. हे पद संपण्याच्या सुमारास रिद्धी-सिद्धीसहित गणपती रंगमंचावर प्रकट होतात. गणपतीचा शुभाशीर्वाद घेतल्यानंतर ब्राह्मणप्रवेश आणि त्यानंतर शंखासुराच्या वधाचा प्रसंग दाखविला जातो. श्रीविष्णूने शंखासुराचा वध केल्यानंतर नाटकाच्या मूळ गाभ्याला सुरुवात होते.
दशावतारी नाटकांची वैशिष्ट्ये
१चेहºयावरचे भडक रंग, विशिष्ट ढंगातली वेशभूषा, आगळ्या पद्धतीची केशरचना या दशावतारातील विशेष लक्षणीय बाबी होत. दशावतारी नाटकांमध्ये काम करणारे कलाकार स्वत:ची रंगभूषा, वेशभूषा स्वत: साकारतात. मात्र, या सर्वांमध्ये कुठेही प्रोफेशनलपणाचा अभाव दिसून येत नाही.
२दशावतार हा नाट्यविषय लिखित स्वरूपात आढळत नाही. विविध पौराणिक ग्रंथ वाचून, ऐकीव कथेच्या साहाय्याने कलाकार स्वयंस्फूर्तीने भाषणे करतात.
३दशावतार या कलाप्रकारात स्त्री-भूमिका साकारणारे कलाकार हे नेहमी पुरुषच असतात. आपल्या समोरचा कलावंत हा पुरुष नसून एखादी स्त्रीच आहे, असे भासण्याइतपत हुबेहुबता त्यांच्यात नक्कीच असते. कोणतेही प्रशिक्षण न
घेता अभिनयाची एवढी समज एखाद्या ग्रामीण कलावंताच्या अंगी असणे म्हणजे एक प्रकारची दैवी देणगीच म्हणावी लागेल.