कारगिल विजय दिवसानिमित्त सैनिक फेडरेशनच्यावतीने 'महाराष्ट्र सन्मान अवॉर्ड २०२१'ने उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून नार्कोटिक कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई झोनचे प्रमुख समीर वानखेडे यांचा गौरव करण्यात आला आहे. तसेच राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील नुकतेच समीर वानखेडे यांना 'महाराष्ट्र सन्मान अवॉर्ड' देऊन त्यांनी केलेल्या धडक कारवायांची दखल घेतली.
अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येशी निगडित ड्रग्ज प्रकरणात अनेकांना अटक करून करून त्यांच्यावर कठोर कारवाई करणारे समीर वानखेडे यांनी अंडरवर्ल्डशी जोडलेली ड्रग्जची पाळेमुळे देखील खोदून काढायला सुरुवात केली. अलीकडेच नागपाड्यात ड्रग्जच्या कारखान्यावर छापा टाकून कोटींची रोकड जप्त केली. तसेच आंतरराष्ट्रीय धागेदोरे जोडलेले अंडरवर्ल्डचे ड्रग्जचे रॅकेट उघडकीस आणण्याचे धडाडीचे काम समीर वानखेडे यांनी केले. यामुळेच त्याच्या या प्रशंसनीय कामाची दखल घेऊन ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांच्या सैनिक फेडरेशनच्या वतीने त्यांना अवॉर्ड देऊन गौरविण्यात आलं. एनसीबी मुंबई झोनचे प्रमुख नेतृत्व करणारे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांच्या कामगिरीमुळे त्यांच्यावर सोशल मीडियावर देखील कौतुकाचा वर्षाव होत असतो.
समीर वानखेड़े महाराष्ट्रातील राहणारे असून ते २००८ बॅचचे भारतीय राजस्व सेवा आयआरएसचे अधिकारी आहेत. आयआरएसमध्ये आल्यानंतर त्यांची पहिली पोस्टींग मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाली. येथे डेप्युटी कमिश्नर म्हणून ते तैनात होते. अत्यंत हुशार व शार्प असल्याने त्यांना आंध्रप्रदेश आणि त्यानंतर दिल्लीतही काही केससाठी पाठविण्यात आलं आहे. समीर यांना ड्रग्ज व नशा यासंबंधित जोडलेल्या प्रकरणाबाबत स्पेशालिस्ट मानलं जातं.