सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 06:54 AM2024-11-15T06:54:32+5:302024-11-15T06:54:57+5:30

भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.  

Data of 30 thousand people hacked by SIM card company employees | सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : नामांकित सिमकार्ड कंपनीचे कर्मचारीच सायबर ठगांशी हातमिळवणी करत बेकायदेशीररीत्या सिमकार्ड क्रमांक पोर्ट करून तो सायबर ठगांना पुरवत असल्याचे सायबर (मध्य) पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांसह आठ जणांना मुंबई, ठाण्यातून अटक केली आहे. या ठगांनी गेल्या वर्षभरात ३० हजार सिम कार्ड परदेशी नागरिक तसेच इतरांना कोणतीही केवायसी कागदपत्रे न स्वीकारता बेकायदेशीररीत्या विकल्याचे समोर आले आहे. 

महेश कदम (दिवा), रोहित यादव (भांडुप), सागर ठाकूर (वडाळा), राज आर्डे (कल्याण) एअरटेल डीएसई कर्मचारी गुलाबचंद जैस्वार (कांदिवली), दुकान मालक  उस्मान अली शेख (कुलाबा), अबुबकर सिद्दिकी युसुफ (कुलाबा) आणि व्हीआय कंपनीचा कर्मचारी महेश पवार (घाटकोपर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे ते २८ जून दरम्यान आरोपींनी तक्रारदार यांना दोन व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ॲड. केले. पुढे, शेअर ट्रेडिंगमध्ये  पैसे गुंतवणूक करण्यासाठी त्यांचे ब्रोकरेज कंपनीच्या व्हर्च्युअल पेजवर खाते तयार करून बनावट नफा जमा होत असल्याचे दाखवले. 

विविध बँक खात्यांमध्ये एकूण ५१ लाख ३६ हजार जमा करण्यास भाग पाडले. सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्याने कोणतीही केवायसी कागदपत्रे न घेता फक्त यूपीसी कोडद्वारे मोबाइल क्रमांक पोर्ट करून ते सायबर भामट्यांना आर्थिक फसवणुकीसाठी पुरवल्याचे समोर आले. यामध्ये भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक  झाल्याचे समोर आले आहे.  

पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाणे, मध्य विभागाच्या प्रभारी पोलिस निरीक्षक मौसमी पाटील यांच्यासह आकांक्षा नलावडे, पोलिस अंमलदार नवनाथ वेताळे, प्रकाश बावडेकर, जय गदगे यांनी तपास सुरू केला. तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने पोलिस या टोळीपर्यंत पोहोचले. 

असे चालायचे रॅकेट 
- यातील पीडितांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये कदम, ठाकूर, आर्डे आणि जैस्वार हे हॅन्डलूम एम्पोरियम वोडाफोन आयडिया मुंबईचे डायरेक्ट सेल्स एक्झिक्युटिव्ह (डीएसई)  आहेत. 
- त्यांनी एअरटेल डीएसई कर्मचारी गुलाबचंद कन्हैया जैस्वार याच्या मदतीने बेकायदेशीररीत्या एअरटेलमधून व्होडाफोन आयडियामध्ये फक्त युनिव्हर्सल प्रॉडक्ट कोडचा वापर (यूपीसी) करून विविध राज्यांतून मुंबई येथे मोबाइल क्रमांक पोर्ट केले आहेत.  
- जैस्वारकडून सिमकार्ड मिळवल्यानंतर सिम कार्ड सुरू करून कमिशनसाठी शेख आणि युसूफच्या दुकानासह विविध दुकानांत विकले. महेश पवार हा व्हीआय कंपनीचा कर्मचारी असून कदम, ठाकूर, आर्डे आणि जैस्वार यांचा टीम लीडर आहे. बेकायदेशीररीत्या पोर्ट करण्यात आलेल्या मोबाइल क्रमांकांसंबंधित त्यास सर्व माहिती होती.

Web Title: Data of 30 thousand people hacked by SIM card company employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.