महाराष्ट्राला विधानसभेचं 'याड लागलं', चंद्रकांत पाटलांनी सांगितली तारीख
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 08:11 AM2019-06-23T08:11:22+5:302019-06-23T08:12:21+5:30
महाराष्ट्रात 3 ते 4 महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत.
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 1 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या काळात राज्यात विकासयात्रा काढणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती देण्यासाठी ही यात्रा असून या यात्रेचे नाव ‘विकासयात्रा’ किंवा ‘दिसतोय फरक शिवशाही परत’ असे असणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले असून त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर विधानसभा निवडणुकांची तारीखही सांगितली. अंदाजे, 15 ते 20 ऑक्टोबर या कालावधी विधानसभा निवडणुकांना सुरुवात होईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्रात 3 ते 4 महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांसह, कार्यकर्ते आणि जनतेलाही विधानसभा निवडणुकांचे याड लागलंय. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शनिवारी काही जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली. लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळूनही हे बदल करण्यात आले आहेत. नंदुरबारमध्ये खा. हीना गावित यांच्या जागी भाजप ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी यांना अध्यक्ष करण्यात आले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रदेश बैठकीनंतर पत्रकारांना या बाबत माहिती दिली. नागपुरात सध्याचे अध्यक्ष आणि दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांच्या जागी माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक प्रवीण दटके यांना अध्यक्षपदी नेमण्यात आले. रमेश चिकोडे - कोल्हापूर शहर, विक्रम देशमुख - नंदुरबार, संजय पाटील - जळगाव ग्रामीण, नांदेड- दिलिप कंदकुर्ते आणि मालेगाव शहर -विवेक वारुळे असे नवीन अध्यक्षही नेमण्यात आले आहेत. बदलण्यात आलेल्या बहुतेक जिल्हाध्यक्षांची तीन वर्षांची मुदत आधीच संपली होती पण लोकसभा निवडणुकीमुळे नवीन अध्यक्षांची नियुक्ती लांबली होती.
मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis ऑगस्ट महिन्यात राज्यभर ‘#फिर_एक_बार_शिवशाही_सरकार’, अशी यात्रा काढून जनतेशी संवाद साधतील. भाजपाची राज्यातील सदस्यता २५ लाखाने वाढविण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) June 22, 2019
दुष्काळग्रस्तांना मदत
राज्यात अब की बार शिवशाही सरकार हा आमचा निर्धार असून युती किमान 220 जागा जिंकेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. राज्याच्या दुष्काळग्रस्त भागातील मुलींना 9 महिन्यांचा बसचा पास, कपडे तसेच पावसाळी बुट देण्यात येणार आहेत. स्थानिक पातळीवरील भाजपा कार्यकर्ते त्याची व्यवस्था करतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सोमवारी संध्याकाळी पाच वाजता विधान भवनात दोन्ही सभागृहांतील युतीच्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.