सीईटीची तारीख जाहीर, तरी प्रश्नसंचाचा निर्णय होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:05 AM2021-07-21T04:05:50+5:302021-07-21T04:05:50+5:30
एससीईआरटीच्या कारभारावर टीका : खासगी प्रकाशकांशी साटेलोटे करत राजकीय पक्षांचा प्रचार सुरू सीमा महांगडे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...
एससीईआरटीच्या कारभारावर टीका : खासगी प्रकाशकांशी साटेलोटे करत राजकीय पक्षांचा प्रचार सुरू
सीमा महांगडे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेसाठी एससीईआरटीकडून विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून हवेत का? याबाबत चाचपणी करण्यात आली होती. त्या वेळी जवळपास ८० टक्के विद्यार्थ्यांनी प्रश्नसंचाची मागणी केली. मात्र सीईटीच्या परीक्षेची तारीख निश्चित झाली तरी प्रश्नसंचाबाबत एससीईआरटीकडून निर्णय झालेला नाही. उलट बाजारात खाजगी प्रकाशनांची आणि कोचिंग क्लासेसच्या सीईटी प्रश्नपेढ्या उपलब्ध झाल्या आहेत. अनेक राजकीय पक्षांनी या खाजगी प्रकाशनांच्या प्रश्नपेढ्या आणि संच विद्यार्थ्यांना मोफत वाटण्यास सुरुवात करून स्वतःच्या प्रचारास सुरुवात केली आहे.
सीईटी परीक्षेसाठी बहुपर्यायी उत्तरे असणाऱ्या प्रश्नांचा सराव करणे अवघड वाटत असल्याने एससीईआरटीच्या सर्वेक्षणात विद्यार्थ्यांनी प्रश्नसंचाची मागणी केली होती. मात्र या सर्वेक्षणाला १५ दिवस उलटूनही प्रश्नसंचाबाबत कार्यवाही न केल्याने शिक्षण विभागाच्या असमन्वयामुळे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांकडून होत आहे.
या सगळ्यात राजकीय पक्ष आणि खाजगी प्रकाशक आपली पोळी भाजून घेत असल्याचा आरोप तज्ज्ञ करत आहेत. राजकीय पक्षांकडून विद्यार्थ्यांना सीईटी प्रश्नसंचाचे मोफत वाटप करण्यात येत आहे. त्यासाठी त्यांनी खाजगी कोचिंग क्लासेस आणि प्रकाशनांना हाताशी धरले आहे. काही दुकानांतही सीईटी प्रश्नसंच उपलब्ध असून, ऑर्डरप्रमाणे घरपोच केले जाण्याचा व्यापार सुरू असल्याच्या तक्रारी शिक्षक करीत आहेत. एससीईआरटीने अधिकृत प्रश्नसंच पुरविले असते तर या प्रश्नसंचाच्या प्रलोभनांना विद्यार्थी बळी पडले नसते, अशी टीका मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून होत आहे.
अद्याप प्रश्नसंचाचा अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. खाजगी प्रकाशक किंवा एससीईआरटीकडून पुरविण्यात येणाऱ्या प्रश्नसंचातीलच प्रश्न परीक्षेला येतीलच असे सांगता येणार नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाप्रमाणे अभ्यास करून परीक्षा द्यावी.
- दिनकर टेमकर, संचालक, एससीईआरटी