ठाणे : ‘यदा-कदाचित’ नाटकाचे निर्माते दत्ता घोसाळकर यांचे मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने महागिरी येथील निवासस्थानी दुःखद निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. बुधवारी दुपारी त्यांच्यावर जवाहरबाग स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
नाटकातच रमणारे दत्ता घोसाळकर यांचे ‘यदा-कदाचित रिटर्न’ हे नाटक २६ डिसेंबरपासून रंगभूमीवर येणार होते. कोरोनानंतर त्याचा पहिला प्रयोग होणार होता, तसेच त्यांचे दोन प्रोजेक्टवर काम सुरू होते. ‘आईचं घर उन्हाचं’ हे त्यांचे निर्माता म्हणून पहिले नाटक होते. नंतर ते संतोष पवार यांच्या ‘यदा-कदाचित’ नाटकामुळे प्रकाशझोतात आले. या नाटकाला अनेक पुरस्कार मिळाले. त्यांनी आपल्या ‘श्री दत्त विजय’ संस्थेतर्फे रंगमंचावर आणलेल्या नाटकांपैकी उल्लेखनीय नाटके म्हणजे ‘देहभान’, ‘तनमन’, ‘वंदे मातरम्’, ‘लाली लीला’, ‘घर श्रीमंताचं’, ‘किमयागार’ या सगळ्या नाटकांचे मिळून सहा हजारांपेक्षा जास्त प्रयोग झाले. ‘शर्यत’ या सिनेमाच्या व्यवस्थापनाचे काम त्यांनी पाहिले. फू बाई फू, कॉमेडी एक्स्प्रेस या विनोदी मालिकांतील जास्तीतजास्त कलाकार त्यांच्या संस्थेमधील आहेत. रमाकांत राक्षेंनंतर स्वत:च्या नाट्य संस्थेची बस घेणारा निर्माता ही ओळख त्यांनी निर्माण केली. दिवंगत विनायक दिवेकर यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेमुळे ते निर्मिती क्षेत्राकडे वळाले. दिग्दर्शक विजय जोशी व राजन भिसे यांच्याकडून त्यांनी या क्षेत्रातील बारकाव्यांचे धडे गिरवले.
शोकसंवेदना :
माझी ध्वनी संयोजन म्हणून सुरुवात ‘यदा-कदाचित’ नाटकामुळे झाली. त्या वेळी दत्ता घोसाळकर यांनी खूप मदत केली आणि त्यांच्यामुळे या क्षेत्रात मी उभा राहिलो.
- अभिजित केंडे, ध्वनी संयोजक
——————-
‘यदा-कदाचित’नंतर दत्ता घोसाळकर यांनी ‘देहभान’सारखे वेगळे नाटक करायचे ठरवले तेव्हा अनेकांनी त्यांना वेड्यात काढले होते. डॉ. आनंद नाडकर्णी यांचे ‘तुझ्याविना’ही त्याने केले. मला तो नेहमी सोहोनी मास्तर म्हणायचा
- कुमार सोहोनी, दिग्दर्शक
-----------------
आम्ही दोघेही मंगळवारी गडकरी रंगायतन येथे भेटलो होतो. नाटकांबद्दल चर्चा केली. ‘जाणूनबुजून’ नाटकाच्या वेळी आम्हाला धमकीचे फोन यायचे त्या वेळी दत्ता घोसाळकर आम्हाला आनंद दिघे यांच्याकडे घेऊन गेले होते. त्या वेळी दिघे यांनी ठाण्यात तुम्ही निश्चिंत राहा, असे सांगितले होते.
- संदीप विचारे, नाट्यनिर्माते
————————
‘देहभान’ हे नाटक मी त्यांच्यासोबत केलं. हे नाटक अतिशय वेगळं होतं. आनंद नाडकर्णी यांचं ‘तुझ्याविना’ हे नाटक आम्ही दोघांनी केलं. लॉकडाऊनआधी आम्ही एकमेकांशी बोललो होतो. त्या वेळी ते म्हणाले, “आपण पुन्हा एकत्र नाटक करू.” पण, ते काय होते हे कळायच्या आत ते गेले.
- डॉ. गिरीश ओक, ज्येष्ठ अभिनेते
...............
मी दिग्दर्शक असलो की, ते निर्माते असायचे. त्यांनी नाटकांचे कधी रीडिंग केले नाही. मी त्यांना कल्पना दिली की, ते थेट तालमीला सुरुवात करायचे. लॉकडाऊन काळात नाट्यकलाकारांना त्यांनी खूप मदत केली होती. मंगळवारी आम्ही गडकरी रंगायतन येथे भेटून नाटकांविषयी चर्चा केली. २६ डिसेंबरपासून आम्ही ‘पुनश्च हरी ॐ’ करणार होतो, पण त्याआधीच ही दुर्दैवी घटना घडली.
- संतोष पवार, दिग्दर्शक
फोटो १६ ठाणे दत्ता घोसाळकर
.........................