Join us

Mumbai Cruise Rave Party: क्रुझ पार्टीवर राष्ट्रवादीच्या जेष्ठ मंत्र्याची मुलगी अन् मुलगाही सहभागी?; नव्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2021 1:05 PM

BJP Allegations on NCP: मोहित भारतीय यांनी नवाब मलिकांना मंत्रिपदावरुन निलंबित करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात चर्चेत असलेल्या मुंबई क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात NCB तपास अधिकारी समीर वानखेडे(Sameer Wankhede) यांच्यावर मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने आरोप लावले. बॉलिवूडमध्ये दहशत पसरवण्यासाठीच NCB चा वापर केला जात असून वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. त्यानंतर आता भाजपा नेते मोहित भारतीय यांनी या कारवाईबाबत मोठा दावा केला आहे.

मोहित भारतीय यांनी ट्विट करत क्रुझवरील पार्टीत(Cruise Rave Party) राष्ट्रवादी(NCP) मंत्र्याची मुलगी आणि राष्ट्रवादीच्याच ज्येष्ठ मंत्र्याचा मुलगा त्याच्या मित्रांसोबत उपस्थित होता. मग शिप बोर्डिंग होण्यापूर्वीच ते पळून का गेले? असा सवाल मोहित भारतीय(BJP Mohit Bhartiya) यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आर्यन खान प्रकरणात आणखी किती जण सहभागी होते यावर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.

नवाब मलिकांच्या निनावी पत्रावरही संशय

काही दिवसांपूर्वी नवाब मलिक(Nawab Malik) यांनी NCB अधिकाऱ्याचं निनावी पत्र ट्विट करत समीर वानखेडे यांच्या स्पेशल २६ प्रकरणात आरोप केले होते. या पत्राचा हवाला देत मलिकांनी NCB ला पत्र लिहून चौकशी करण्याची मागणी होती. मात्र हे पत्र ज्या लिफाफ्यातून आले होते त्यावर पोस्टल स्टॅम्प सगवट, बेगूसराय, बिहारचा उल्लेख होता. हे पत्र बनावट असल्याचा आरोपही मोहित यांनी केला. मोहित म्हणाले की, मुंबईत NCB मध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याने हे पत्र त्यांना पाठवलं असा मलिकांनी दावा केला होता. परंतु या निनावी पत्राचा लिफाफा पाहिला तर त्यावर बिहारचा स्टॅम्प आहे. मलिक यांनी स्वत: बनावटपणे हा स्टॅम्प लावून पत्र तयार केले होते असा आरोप भारतीय यांनी केला.

याबाबत आता NCB अधिकारी आणि चीफ पोस्ट मास्टर जनरल यांना मोहित भारतीय यांनी पत्र पाठवलं आहे. या पत्राबाबत संशय निर्माण झाला असून याबाबत उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तर निनावी पत्राच्या आधारे कुठल्याही प्रकारची तपासणी करण्यात NCB ने नकार दिला आहे. मोहित भारतीय यांनी नवाब मलिकांना मंत्रिपदावरुन निलंबित करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे.

मलिकांचा समीर वानखेडेंवर आरोप

क्रुझवरील छापेमारीवेळी(Mumbai Cruise Drugs Case) एक दाढीवाला आणि त्याची गर्लफ्रेंड उपस्थित होती. तो दाढीवाला कोण? असा सवाल करत वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचा दावा मलिकांनी केला. त्याला सोडून का देण्यात आले? असा सवालही मलिकांनी विचारला होता. मात्र आता यानंतर क्रुझवर राष्ट्रवादी मंत्र्यांची मुलगी आणि मुलगा उपस्थित असल्याचा दावा भाजपाच्या मोहित भारतीय यांनी करुन खळबळ माजवली आहे. त्यामुळे हे मंत्री कोण याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.

टॅग्स :मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टीनवाब मलिकराष्ट्रवादी काँग्रेसआर्यन खान