भांडणात मुलीने आईचे बोट तोडले; आईने गळा आवळला, प्रेमसंबंधाच्या विरोधातून झालेला वाद विकोपास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 09:39 AM2024-03-13T09:39:22+5:302024-03-13T09:40:29+5:30

वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरातील घटना

daughter breaks mother finger in fight and mother killed her | भांडणात मुलीने आईचे बोट तोडले; आईने गळा आवळला, प्रेमसंबंधाच्या विरोधातून झालेला वाद विकोपास

भांडणात मुलीने आईचे बोट तोडले; आईने गळा आवळला, प्रेमसंबंधाच्या विरोधातून झालेला वाद विकोपास

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : प्रेमसंबंधांच्या विरोधातून झालेल्या भांडणात बोट तोडल्याच्या रागात आईनेच १९ वर्षीय लेकीला संपविल्याची धक्कादायक घटना वांद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात घडली. याप्रकरणी टीना उमेश बागडे (वय ४०) या महिलेवर निर्मलनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत अटक केली.

आरोपी टीना उमेश बागडे ही तिची मुलगी भूमिका आणि दोन मुलासोबत खेरवाडीच्या प्लॉट ८० येथील नथू गणपत चाळीत राहत होती. तिच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. भूमिका ही ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी असून तिचे रोहित नामक तरुणासोबत प्रेमसंबंध होते. टीना हिला त्यांच्या नात्याबद्दल कळल्यावर विरोध केला. यावरून आई टीना आणि मुलगी भूमिका यांच्यामध्ये रोज भांडण होत होते. सोमवारीही यावरूनच त्यांच्यात भांडण झाले. हाणामारीवेळी रागावलेल्या भूमिकाने तिच्या आईच्या बोटाचा चावा  घेतला. यात बोटाचा तुकडा पडला. याच रागाने टीना हिने भूमिकाचा गळा दाबून खून केला.

परिमंडळ ८ चे पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांच्या देखरेखीखाली सहायक पोलिस आयुक्त सुहास कांबळे, वरिष्ठ निरीक्षक श्रीमंत शिंदे यांनी तपास करण्यासाठी पथक नेमले. 

जखमांमुळे संशय बळावला

- टीना बागडेचा भाऊ तिच्या घरी आले तेव्हा तिने भूमिकाला फिट आल्याचे सांगितले. त्यांनी भूमिकाला व्हीएन देसाई रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

- याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आणि पंचनामा करताना तिच्या भुवयाजवळ तसेच मानेवर झालेल्या जखमांमुळे पोलिसांना बागडेच्या कथेत काही तरी गफलत आहे, असे वाटू लागल्याने पोलिसांचा संशय बळावला.

भावंडांनी सांगितली हकिकत

- ही घटना भूमिकाच्या लहान भावंडांसमोर घडली; परंतु आई टीना हिने या घटनेबद्दल कोणालाही न सांगण्याची धमकी दिली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना विश्वासात घेत चौकशी केल्यावर त्यांनी सर्वकाही सांगितले. 

- भूमिकाला फिट येण्याची हिस्ट्री होती आणि तिच्यावर नागरी रुग्णालयात उपचारही झाले असल्याने टीना बागडेने त्याचा वापर तिच्या गुन्ह्यावर पांघरूण घालण्यासाठी केला.

- पोस्टमॉर्टममध्ये भूमिकाचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पाेलिसांनी बागडे आणि तिच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावले.

- शिंदे यांच्या सूचनेवरून निर्मलनगर पोलिसांनी मंगळवारी पहाटे टीना बागडेवर गुन्हा दाखल करत अटक केली. तिला १६ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

 

Web Title: daughter breaks mother finger in fight and mother killed her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.