- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : परीक्षेत आलेल्या अपयशाबाबत वडील रागावल्याने आत्महत्या करीत असल्याचे संचिता उर्फ नयना सुरेश वाघ (वय २१) हिने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. तिच्या खोलीतून ही सुसाईड नोट चारकोप पोलिसांच्या हाती लागली आहे. तिचे फेसबुक अकाऊंट हॅक झाले होते. हॅकरकडून शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे ती दडपणाखाली होती, अशी चर्चा तिच्या मित्रमंडळीत आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तांच्या प्रवक्त्या, उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी सांगितले. चारकोप बंदर पकाडी रोडवरील शिवशंकर चाळीत राहणाऱ्या संचिताने घरात गळफास घेतला होता. एफवायच्या परीक्षेत अपयशामुळे तिने आत्महत्या केल्याचे बोलले जाते. परंतु तिचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले होते. हे करणारा तिच्या नावाने विविध लोकांना अश्लील मेसेजेस पाठवत होता. त्यामुळे संचिता तणावाखाली होती. हे सर्व थांबवायचे असेल तर माझ्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतील, अशी धमकी त्याने दिली होती. त्याबाबत तिने ५ मे रोजी चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ती बीकेसीच्या सायबर सेलकडे वर्ग करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांना काहीच सुगावा लागला नाही. त्यामुळे संचिता निराश झाली होती. यातूनच तिने जीव दिल्याचा संशय मित्रमैत्रिणींना आहे.पोलीस खात्यात भरती होण्याची संचिताची इच्छा होती. पण परीक्षेत अपयश आले. या कारणावरून वडील रागावले. त्यामुळे आत्महत्या करत असल्याची संचिताची चिठ्ठी सापडली आहे. त्यामुळे आता तिच्या आत्महत्येमागील गुंता वाढला आहे.
वडील रागावल्याने संचिताने केली आत्महत्या
By admin | Published: June 16, 2017 1:12 AM