Join us  

मुलगी बोरीवलीत, मुलगा अमेरिकेत; एकाकी बापाने शिवडीत सोडला प्राण!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 9:10 AM

घरातून दुर्गंधी येत असल्याने दोन दिवसांनी झाला मृत्यूचा उलगडा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सुलोचना शेट्टी या आजींच्या मृत्यूच्या घटनेने सर्वांनाच सुन्न केले असतानाच, सोमवारी रात्री शिवडीतील एका इमारतीच्या फ्लॅटमधून ६७ वर्षीय आजोबांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. उदय अनंत भट असे मृत आजोबांचे नाव असून, हृदयविकाराचा झटका येऊन त्यांनी खुर्चीतच प्राण सोडले. घरातून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाल्याने, पोलिसांनी खुर्चीसह त्यांचा मृतदेह बाहेर काढला.

खासगी कंपनीतून निवृत्त झालेले भट हे गेल्या दोन-तीन वर्षांपासून शिवडीतील ज्युबिली हाइट्स या इमारतीच्या १५ व्या मजल्यावर भाडेतत्त्वावर एकटे राहण्यास होते. एक मुलगा, मुलगी आणि पत्नी असे कुटुंब. मुलगा अमेरिकेत असतो तर मुलगी बोरीवली परिसरात राहते. गेल्या वर्षभरापासून त्यांना गँगरीनचा त्रास सुरू झाला. त्यामुळे घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी झाले.  सोमवारी रात्री घरातून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाल्याने शेजारच्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. काळाचौकी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जाधव यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. घरमालकाच्या मदतीने दरवाजा उघडताच भट हे खुर्चीतच मृतावस्थेत पडलेले आढळले. शरीरारावर किडे पडण्यास सुरुवात झाली होती. मृतदेह पाहून पोलिसही सुन्न झाले. दुर्गंधीमुळे मृतदेह उचलण्यासाठीही कोणी पुढे यायला तयार नव्हते. परिसरातील काही जणांच्या मदतीने जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेह खुर्चीसहित खाली आणला. या प्रकरणी काळाचौकी पोलिसांनी नैसर्गिक मृत्यूची नोंद करीत नंतर मृतदेह मुलीच्या ताब्यात दिला.

मृतदेह नेण्यास रुग्णवाहिकेचा नकारमृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका तयार नव्हती. पोलिसांनीच त्यांना दम भरून रुग्णवाहिका साफ करून देणार असल्याचे आश्वासन दिले. तेव्हा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात नेल्याचे स्थानिकांनी सांगितले.

कुटुंबीयांचा व्हॉट्सॲप संवादकुटुंबीय व्हिडीओ कॉलवर त्यांची चौकशी करीत होते.  काही दिवसांपूर्वीच भट घरात पडले. घराच्या फटीतून ही बाब समजताच डब्बे घेऊन येणाऱ्या महिलेच्या मदतीने त्यांच्यावर उपचारही झाल्याचे कळते. ते असे अनेकदा घरात पडत असल्याचेही एका पोलिसाने नमूद केले.

फटीतूनच संवाद ...घराच्या दरवाजाला असलेल्या फटीतूनच त्यांच्याशी कचरा नेणारी व्यक्ती तसेच डब्बा घेऊन येणारी महिला संवाद साधायची. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचा काहीच प्रतिसाद आला नाही. अखेर, घरातून दुर्गंधी येण्यास सुरुवात झाल्याने शेजारच्यांनी पोलिसांना कळविले.