लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वडिलांच्या दुसऱ्या विवाहाच्या वैधतेला मुलगी न्यायालयात आव्हान देऊ शकते, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.
ज्या दोघांचा विवाह झाला आहे, तेच दोघे विवाहाच्या वैधतेला न्यायालयात आव्हान देऊ शकतात, या कुटुंब न्यायालयाच्या निर्णयाला एका ६६ वर्षीय महिलेने उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या. आर. डी. धानुका व न्या. व्ही. जी. भिष्ट यांनी ही याचिका दाखल करून घेतली.
निकालानुसार, संबंधित महिलेने सन २०१६ मध्ये कुटुंब न्यायालयात दिवंगत वडिलांच्या दुसऱ्या विवाहाच्या वैधतेला आव्हान दिले. तिने केलेल्या याचिकेनुसार, २००३ मध्ये तिच्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या वडिलांनी लगेच दुसरा विवाह केला. २०१६ मध्ये तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिला समजले की, वडिलांनी ज्या महिलेशी दुसरा विवाह केला, त्या स्त्रीने २०१६ पर्यंत तिच्या पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतला नव्हता. त्यामुळे तिच्या वडिलांचा दुसरा विवाह वैध असल्याचे म्हणता येणार नाही. मात्र, विवाह झालेल्या व्यक्तीच म्हणजे पती किंवा पत्नी त्यांच्या विवाहाच्या वैधतेला आव्हान देऊ शकतात, असा युक्तिवाद महिलेच्या सावत्र आईकडून कुटुंब न्यायालयात करण्यात आला.
मात्र, उच्च न्यायालयाने म्हटले की, मुलीला वडिलांच्या निधनानंतर हे सत्य समजले. त्यानंतर तिने लगेच कुटुंब न्यायालयात धाव घेतली. वडिलांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या विवाहातील या त्रुटी समोर आणून वडिलांच्या विवाहाच्या वैधतेला आव्हान दिले. मुलीला वडिलांच्या दुसऱ्या विवाहाच्या वैधतेला आव्हान देण्याचा अधिकार नाही, हा कुटुंब न्यायालयाचा निर्णय अयोग्य आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने मुलीच्या अर्जावर नव्याने सुनावणी घेण्याचे आदेश कुटुंब न्यायालयाला दिले.