पणत्यांचा गुजरात-व्हाया लंडन प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 02:05 AM2018-10-22T02:05:37+5:302018-10-22T02:05:48+5:30
दसरा उत्साहात पार पडल्यानंतर आता घराघरात दिवाळीच्या तयारीची धामधूम सुरू झाली आहे.
मुंंबई : दसरा उत्साहात पार पडल्यानंतर आता घराघरात दिवाळीच्या तयारीची धामधूम सुरू झाली आहे. दिवाळीत होणारी दिव्यांची रोषणाई डोळे दिपविणारी असते. असे दिवे घडविणारे कलाकारही आता सज्ज झाले असून, धारावीच्या कुंभारवाड्यातील ‘दीपंकार’ने केवळ मुंबईच नव्हे, तर सातासमुद्रापार राहणाऱ्या प्रत्येकाच्याच घरातील दिवाळी प्रकाशमय करण्याचा चंग बांधला आहे. धारावीतील दिव्यांच्या बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड असून, हा बाजार दिवसेंदिवस गर्दीने फुलत आहे. या बाजारपेठेचे वैशिष्ट्य म्हणजे, येथील दिवे गुजरात-मुंबई व्हाया लंडन असा अनोखा प्रवास करत आहेत.
अनेक घरगुती उद्योगांचे माहेरघर असलेल्या धारावीतल्या मातीच्या पणत्याही प्रसिद्ध आहेत. मातीच्या पणत्यांना चीनी बनावटीच्या पणत्यांची स्पर्धा असली, तरी काही ग्राहक आपल्या मातीचे प्रेम विसरलेले नाहीत. पणत्यांचे इतर ट्रेंडही आता लोकप्रिय होऊ लागले आहेत. त्यात चीनी मातीच्या पणत्या, फॅन्सी पणत्या, साध्या पणत्या असे प्रकार आहेत.
धारावीतील व्यावसायिक
दिनेश यांनी सांगितले की, आजही मातीच्या पणत्यांना प्रचंड मागणी आहे. याशिवाय, धारावीत मोठ्या प्रमाणात गुजरातमधून तयार मातीचे दिवे येतात. हे दिवे घाऊक
प्रमाणात घेतले जातात, त्यांच्यावर कोनवर्क, रंगकाम केले जाते. त्यानंतर, हे दिवे दुबई, लंडन येथेही निर्यात होतात. या पणत्या गेरूच्या घट्ट रंगात भिजवून, सुकल्यानंतर विक्रीसाठी ठेवल्या जातात. कुंभारवाड्यात त्या अगदी स्वस्त दरात मिळतात. सुरुवातीला या बाजारातील भाव
कमी असतात. मात्र, दिवाळीच्या
काही दिवसांपूर्वी बाजार भावात प्रचंड वाढ होते.
>प्रत्येक घराबाहेर भट्टी...
येथील प्रत्येक घराबाहेर चौकोनी खड्डा तयार करण्यात आला आहे. येथे माती भिजवली जाते. ही माती पणत्या, माठ आदी वस्तू तयार करण्यासाठी वापरली जाते. मातीतील मोठे खडे, कचरा काढून टाकला जातो. कुंभारवाड्यातील बहुतेक व्यवसाय हा घरातील एका खोलीत केला जातो. पणत्या तयार केल्यानंतर त्यांना काही काळ उन्हात वाळवावे लागते. त्या चांगल्या वाळल्यानंतर घरासमोर तयार केलेल्या भट्टीच्या वरच्या थरावर एका वेळेला हजारो पणत्या ठेवल्या जातात.
या भट्टीच्या खाली कापूस व माती एकत्र करून पसरवले जाते आणि त्या भट्टीच्या वरच्या थरात पणत्या ठेवल्या जातात. भट्टीच्या खालच्या बाजूला कोपºयांमधील छिद्रांमध्ये गरम माती घातली जाते. अशा प्रकारे पणत्या भाजण्याचे काम केले जाते.
>धारावी येथे एका घरात पणत्यांना रंग देताना महिला कारागीर.
साध्या पणत्यांना दोन प्रकारचे रंग देण्यासाठी १०० नगांमागे २० ते ३० रुपये दिले जातात, तर नक्षीदार पणत्यांना रंगरंगोटी करण्यासाठी प्रत्येकी ६ पणत्यांमागे ६ रुपये दिले जातात.सध्या कुंभारवाड्यात स्पर्धा खूप वाढली आहे. त्यामुळे मिळेल त्या पैशांमध्ये काम करावे लागते, असे येथील कारागीर महिला ज्योत्स्ना यांनी सांगितले.