Join us

डाळ व्यापाऱ्यांकडे खंडणी मागणारे पोलीस अटकेत

By admin | Published: November 09, 2015 3:12 AM

तूरडाळीच्या चढ्या दराने उच्चांक गाठला असताना मसूरडाळीच्या प्रोसेसिंग क ारखान्यावर छापा टाकून तीन लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या सुनील गुजर

कल्याण : तूरडाळीच्या चढ्या दराने उच्चांक गाठला असताना मसूरडाळीच्या प्रोसेसिंग क ारखान्यावर छापा टाकून तीन लाख रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेच्या सुनील गुजर, संजय सपकाळ, नीलेश वंजारी या तीन पोलिसांना अटक झाली आहे. कल्याण सत्र न्यायालयाने त्यांना बुधवार, ११ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खंडणी वसुलीचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने कॅमेऱ्याचा रेकॉर्ड बॉक्स पोलिसांनी लंपास केला होता; तरीही त्यांचे उद्योग उघड झाले.या प्रकरणातील तक्रारदार व्यापाऱ्याचा मोहने-शहाड परिसरात मसूरडाळ प्रोसेसिंग कारखाना आहे. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस नाईक असलेल्या गुजर, सपकाळ, वंजारी यांनी या कारखान्यावर छापा टाकला. या वेळी या पोलिसांसोबत आणखी एक व्यक्ती होती. तुमचा प्रोसेसिंगचा व्यवसाय बेकायदेशीर असल्याचे सांगत चौघांनी संबंधित व्यापाऱ्याकडे कारवाई न करण्यासाठी २५ लाखांची मागणी केली. यातील पहिला हप्ता म्हणून तीन लाख रुपये त्याच्याकडून तत्काळ घेण्यात आले. दरम्यान, हा सर्व प्रकार कारखान्यात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. हा प्रकार उघड होऊ नये, याकरिता हे पोलीस कॅमेऱ्यातील रेकॉर्ड बॉक्स सोबत घेऊन गेले होते. व्यापाऱ्याने या सर्व प्रकाराची तक्रार नोंदवल्यावर अखेर खडकपाडा पोलीस ठाण्यात तिघा पोलिसांविरुद्ध खंडणी उकळण्याचा गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे तिघांचे निलंबन अटळ आहे.