Join us

नववर्षाच्या स्वागताला घुमणार ढोल-ताशांचा ताल...

By admin | Published: March 16, 2015 10:52 PM

मराठी अस्मिता जपणारा गुढीपाडव्याचा सण अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. मराठमोळ््या पध्दतीने हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नवी मुंबईमधील ढोल पथकही सज्ज झाले आहेत.

प्राची सोनवणे - नवी मुंबईमराठी अस्मिता जपणारा गुढीपाडव्याचा सण अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. मराठमोळ््या पध्दतीने हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नवी मुंबईमधील ढोल पथकही सज्ज झाले आहेत. कित्येक महिन्यांपासून सुरू असलेल्या सरावाला पूर्णविराम देऊन, रंगीत तालमीला सुरुवात झाली आहे.नवी मुंबईसारख्या शहरात पुणे, नाशिक येथून येणाऱ्या ढोल पथकांची वाढती मागणी पाहून आपल्या परिसरातही आपल्या हक्काचा ढोल पथक असला पाहिजे, असे इथल्या तरुणांना वाटले. त्यानंतर ऐरोली, खारघर आणि पनवेल याठिकाणी ढोल पथकांची निर्मिती झाली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने अख्खी नवी मुंबई दणाणून टाकण्यासाठी ऐरोलीमधील नादगर्जा ढोल पथकाची जय्यत तयारी सुरु आहे. २०११ पासून या पथकाद्वारे नवनवीन ताल ऐकायला मिळत आहे. १५ सदस्यांनी मिळून या पथकाची सुरुवात झाली आणि आजच्या घडीला वेगवेगळ््या वयोगटातील ४५ हून अधिक सदस्य या पथकात कार्यरत आहेत. या पथकाचा सदस्य निखील चौधरी म्हणतो, रोज नव्याने सराव करताना, आदल्या दिवशी झालेली चूक दुरुस्त करून मगच पुढच्या सरावाला सुरुवात होते, तर अमित घोलप म्हणतो, हा वारसा असाच पुढे चालत राहावा याकरिता आम्ही प्रयत्न करतो. रविवारच्या दिवशी ऐरालीतील मोकळ््या जागी जमून आम्ही काटेकोरपणे सराव करतो. प्रत्येकजण तेवढ्याच मेहनतीने सराव करतो आणि उरलेल्या वेळात मजामस्तीही चालते.खारघरच्या उत्सव ढोल-ताशा पथकाचे यंदाचे हे पहिले वर्ष असून, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शोभायात्रा काढून आम्ही आमचे प्रात्यक्षिक दाखविणार आहोत, असे या ग्रुपचा सदस्य आशिष बाबर म्हणाला. खारघर उत्सव चौकजवळच्या पटांगणावर रोज रात्री सराव केला जातो. या पथकातील तरुण कॉलेज, आॅफिसची वेळ सांभाळून तेवढ्याच जिद्दीने रोजचा सराव करतात. सध्या या पथकात १० मुली आणि १९ मुले आहेत. शिस्तबध्द पध्दतीने सादरीकरण हे पथकाचे वैशिष्ट्य आहे. ढोल-ताशांच्या तालातून परंपरा जपण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करत आहोत, असेही तो म्हणाला.पनवेलरांना आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविणारा युवानाद हा ढोल पथक नववर्ष स्वागतासाठी सज्ज आहे. २०१२ या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर या पथकाची सुरुवात झाली. रायगडमधील सर्वात पहिला ढोल पथक म्हणून नावारुपाला आलेल्या या पथकाद्वारे अनेक शोभायात्रा काढल्या. या पथकात जवळपास १२५ सदस्य असून मुलांबरोबरच मुलीही तितक्याच ताकदीने सराव करतात. या पनवेलमधील स्वरगर्जना ढोल-ताशा पथक हे आपल्या दणकेबाज आणि लयबध्द तालासाठी प्रसिध्द आहे. शंभरहून अधिक सदस्यसंख्या असलेल्या या पथकामध्ये निम्म्यापेक्षा जास्त महिला आणि मुलींचा समावेश आहे.