मुंबई - ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येचा आरोप फेटाळत कुख्यात गँगस्टर छोटा राजन याने त्याचे खापर दाऊद इब्राहिम याच्यावर फोडले आहे. दाऊदच्या गँगमध्ये असेपर्यंत आपल्याविरुद्ध एकही गुन्हा नोंदविण्यात आला नाही. पण त्याच्यापासून विभक्त झाल्यानंतर दाऊदने राजकीय नेते व पोलिसांशी हातमिळवणी करत आपल्यावर खोटे गुन्हे नोंदविले, असा जबाब छोटा राजनने विशेष मकोका न्यायालयात सोमवारी दिला.
छोटा राजन याच्यावर जे. डे हत्येप्रकरणी खटला सुरू आहे. सोमवारी त्याला व्हिडीओ लिंकद्वारे विशेष मकोका न्यायालयात उपस्थित करण्यात आले. सोमवारी त्याला फौजदारी दंडसंहिता कलम ३१३ अंतर्गत न्यायाधीशांनी प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना छोटा राजनने त्याच्यावरील सर्व आरोप फेटाळले.जे. डे छोटा राजनची बदनामी करत होते म्हणून छोटा राजनने त्याच्या हत्येची सुपारी दिली, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, छोटा राजनने हा आरोप फेटाळला. ‘मी जे. डेला मारले, हे चुकीचे आहे,’ असे राजनने मराठीत न्या. एस.एस. आडकर यांना सांगितले.त्यावर न्यायाधीशांनी साक्षीदार त्याच्याविरुद्ध साक्ष का देत आहेत, अशी विचारणा राजनकडे केली. पोलिसांच्या वतीने साक्षीदार माझ्याविरुद्ध साक्ष देत आहेत. माझ्यावर सर्व खोटे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. मलाच माहीत नाही ते गुन्हे काय आहेत, असे उत्तर राजनने न्यायाधीशांच्या प्रश्नावर दिले.१९९३ च्या बॉम्बस्फोटानंतर मी दाऊदची गँग सोडली. याबाबत मी गुप्तहेर यंत्रणेला माहितीही दिली. मी पोलिसांना माहिती पुरविल्याचे दाऊदला समजले. त्यानंतर प्रत्येक केसमध्ये मला आरोपी करण्यात आले. बनावट चकमकीच्या प्रकरणांतही मला आरोपी करण्यात आले. मला तर त्यातील पीडितही माहीत नाही, असे राजनने न्यायाधीशांना सांगितले.जे. डे हत्येप्रकरणी ३१ जानेवारीपासून अंतिम युक्तिवादास सुरुवात होण्याची शक्यता आहे. न्यायालयाने विचारलेल्या बहुतांशी प्रश्नांना छोटा राजनने ‘आपल्याला याविषयी माहीत नाही,’ असेच उत्तर दिले.