मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा साथीदार फहीम मचमचद्वारे मुंबई, गुजरातमधील व्यापाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी उकळणारा दाऊदचा पुतण्या मोहम्मद रिझवान इक्बाल हसन शेख इब्राहिम कासकर (३०) याच्यासह तिघा जणांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने पुण्यात बेड्या ठोकल्या आहेत. रिझवान गेल्या दीड वर्षापासून यात सक्रिय असल्याची माहिती तपासात समोर येत आहे.अश्फाक रफीक टॉवेलवाला (३४) याने मुंबईतील व्यापाऱ्यांसोबत विदेशातून भारतात विविध वस्तू आयात करण्याचा व्यवसाय भागीदारीत सुरू केला. त्यानंतर व्यवसायातून मिळालेले १५ लाख ५० हजार रुपये टॉवेलवाला याने त्या व्यापाºयाला दिले नाहीत. हा वाद मिटविण्यासाठी फईम मचमचने तक्रारदार व्यापाºयाला धमकावले होते.व्यापाºयाने गुन्हे शाखेकडे धाव घेतल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. सोमवारी गुन्हे शाखेने यात, अहमदराजा वधारीया (२४) याला अटक केली. वधारियाच्या चौकशीत रिझवानचे नाव समोर आले. रिझवाननेच आपली ओळख छोटा शकील आणि मचमचसोबत करून दिल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर तो व्यापाºयांना खंडणीसाठी तसेच व्यवसायातील पैसे परत न मागण्यासाठी धमकावत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. रिझवान दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना, गुन्हे शाखेने त्याला अटक केली. त्याच्या अटकेसह टॉवेलवाला यालाही अटक करण्यात आली.
दाऊदचा पुतण्या खंडणीप्रकरणात गजाआड, खंडणीविरोधी पथकाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 6:10 AM