मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेला मातोश्री बंगला उडवून देण्याची धमकी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकाने दिली आहे. या घटनेनंतर मातोश्री बंगल्याची सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मातोश्री बंगल्यावर रविवारी रात्री दुबईवरून चार फोन कॉल आले. या फोनवरील व्यक्तीने दाऊदला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असल्याचे सांगत कॉल ट्रान्सफर करण्यास सांगितले. मात्र कॉल आॅपरेटरने फोन ट्रान्सफर केला नाही. धमकीच्या या फोननंतर मातोश्री परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून, कॉलची चौकशी केली जात आहे.
प्रत्येक व्यक्ती आणि वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. सायबर पोलीस या फोन कॉल्सचा तपास सुरू केला असून हा फोन दाऊद गँगकडून आला की अन्य कोणी खोडसाळपणा केला, याचाही तपास केला जात आहे याबाबत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले की, मातोश्रीवर एक निनावी फोन आला होता. दाऊद गँगचा हस्तक असल्याचे त्याने सांगितले. त्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे होते. मात्र, यात मातोश्री उडवून देण्याची धमकी नव्हती. मात्र या कॉलची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून पोलीस याचा सखोल तपास करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, या प्रकरणाची गृहविभागामार्फत सविस्तर चौकशी करण्यात येईल. सत्यता पडताळण्यात येईल. मात्र, मी आधी शिवसैनिक आहे, नंतर मंत्री. मातोश्री हे आमचे मंदिर आहे. जगाच्या पाठीवर मातोश्रीला हात लावणारा जन्माला यायचा आहे. त्यामुळे यातून कोणीही पुढे आला तरी त्याची हयगय करणार नाही, असेही गृहराज्यमंत्री म्हणाले.
मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील मातोश्री निवासस्थान उडवून देण्याच्या निनावी धमकीबद्धल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच या कृतीचा तीव्र निषेधही करण्यात आला. हे प्रकरण खूप गंभीर असून केंद्र सरकारने देखील याची तातडीने दखल घ्यावी. यामागे जे कुणी असतील त्यांना शोधून कठोर शासन करावे, अशा तीव्र भावना मंत्रिमंडळाने व्यक्त केली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात गुन्हे शाखेने कसून तपास सुरू केल्याची माहिती दिली.
काँग्रेस नेते मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या घटनेबाबत आश्चर्य व्यक्त केले. एकंदर राजकारण कोणत्या स्तराला चालले आहे, याचे हे लक्षण आहे. कारण ही हिंमत कुणी करू शकत नाही. धमकी दिल्याची हिंमत कुणी केली असेल, तर ते एक आश्चर्यच आहे. महाराष्ट्रातील जनता आणि आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे आहोत, असे थोरात म्हणाले. तर, अशा पद्धतीच्या धमक्यांना घाबरणारे हे सरकार नाही, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.