Join us

इंग्रजीचे ज्ञान नसताना इकबालच्या घेतल्या कागदपत्रांवर सह्या; वकिलांचा न्यायालयात दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 6:48 AM

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेल्या कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकारला गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या कोठडीत असलेल्या कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकारला गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दुसरीकडे, इकबालला इंग्रजीचे ज्ञान  नसतानाही, संबंधित कागदपत्रांवर त्याच्या सह्या घेतल्याचा दावा करत त्याच्या वकिलाने न्यायालयात अर्ज केला आहे.

गेल्या आठवड्यात ईडीने इकबालला अटक केली. ठाणे पोलिसांनी २०१७ मध्ये खंडणीच्या एका प्रकरणात इकबालला अटक केली होती. ठाणे पोलिसांनी इकबाल, अनिस इब्राहिम आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या  वसुलीचा गुन्ह्यासंबंधित कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत. या कागदपत्रांच्या आधारे एनआयएने दाऊदशी संबंधित एका प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्याच्या तपासात काही मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांबाबतची माहिती समोर आली होती. त्याआधारे ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करत, ईडीने गेल्या आठवड्यात मुंबई, ठाण्यात छापेमारी करत इकबाल याला अटक केली.

इकबाल डी गँग चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तसेच, व्यावसायिक, सिनेकलाकार, राजकीय मंडळी त्यांच्या रडारवर होते. खंडणीतून येणारी रक्कम टेरर फंडिंगसाठी वापरली जात असल्याचादेखील आरोप ईडीने केला आहे. गुरुवारी ईडी कोठडी संपत असल्याने त्याला विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने कासकारला ईडीकडून काही त्रास देण्यात आला का? याबाबत विचारणा केली. तेव्हा, त्याने नाही असे उत्तर दिले. ईडीने कासकरच्या वाढीव कोठडीची मागणी न केल्यामुळे त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. 

कासकरने केली ईडी कार्यालयात जेवणाची मागणी कासकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर, कासकरने मधुमेहाचा आजार असल्याने कारागृहात जाण्यापूर्वी ईडी कार्यालयात जेवण करण्याची मागणी केली. न्यायालयाने मागणी मान्य करताच, कासकरला ईडी कार्यालयात नेले. तेथे त्याला आधी जेवण दिले. त्यानंतर त्याला ठाणे कारागृहात नेण्यात आले आहे.

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयन्यायालय