मुंबईतील भेंडीबाजारात दाऊदी बोहरा समुदायानं उभारला 'कोविड वॉररुम', रुग्णांना केली जातेय 'स्मार्ट' मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 06:59 PM2021-05-07T18:59:01+5:302021-05-07T18:59:35+5:30
Mumbai Corona Updates: मुंबईतील दाऊदी बोहरा समुदायानं भेंडीबाजार येथे एक 'कोविड वॉररुम' सुरू केली आहे.
Mumbai Corona Updates: मुंबईतील दाऊदी बोहरा समुदायानं भेंडीबाजार येथे एक 'कोविड वॉररुम' सुरू केली आहे. या वॉररुमच्या माध्यमातून ऑक्सिजनच गरज, कोरोना संबंधिचे रिअल टाइम अपडेट्स, बेड्सची उपलब्धता आणि कोरोनाग्रस्त कुटुंबियांना आवश्यक असणारी सर्व मदत केली जाते. इतकंच नव्हे, तर कोविडमुळे मृत्यू झालेल्यांचा योग्यप्रकारे अंत्यविधी होण्यासाठीही मदत करण्यात येते. (Dawoodi Bohra community sets up Covid 19 war room in Mumbai)
भेंडी बाजारातील सैफी बुरहानी उत्थान प्रकल्प संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या 'वॉर रुम'मध्ये एकूण ६० सदस्य काम करत आहेत. यात मल्टी स्पेशालिटी डॉक्टर्स, स्वयंसेवक आणि स्थानिक प्रशासनातील व्यक्तींचा समावेश आहे.
"बोहरा समुदायाच्यावतीनं चालवण्यात येणाऱ्या कोविड वॉर रुममधून उल्लेखनीय काम केलं जातंय. या वॉर रुमचं काम असंच सुरळीत सुरू राहण्यासाठी कोणत्याही प्रकरची मदत लागल्यास ती करण्याची पूर्ण तयारी आहे", असं समाजवादी पक्षाचे नेते रइस शेख म्हणाले.
"ज्यावेळी आम्हाला कोणत्याही रुग्ण किंवा त्याच्या कुटुंबियांकडून फोन येतो त्यावेळी संबंधित रुग्णाला वैद्यकीयबाबतीत लागणारी सर्व प्रकारची मदत करण्यासाठी टीम कामाला लागते. वॉर रुमच्या पॅनलमधील डॉक्टर्स संबंधित रुग्णाला रुग्णालयात दाखल होण्याची गरज आहे किंवा नाही याचं मार्गदर्शन करतात. त्यासोबत उपचारांबाबत योग्य सल्ला देऊन औषधांची माहिती देतात. रुग्णाला ऑक्सिजन किंवा बेडची गरज असेल तर त्यानुसार इतर सदस्य शोधकार्य सुरू करतात आणि रुग्णाला मदत करतात", असं कोविड वॉर रुमचे समन्वयक शाबर मर्चंट यांनी सांगितलं.
"कोरोनाची लागण झालेल्या प्रत्येक रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यची गरजच असते असं नाही. सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांना फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज असते", असं वॉर रुमच्या पॅनलमधील सदस्य डॉ. अबिझर माकंड म्हणाले. यासोबतच कोरोना काळात अशाप्रकारच्या 'वॉर रुम' खरंच खूप गरजेच्या असल्याचंही ते म्हणाले.