"दाऊदचा भाचा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांसोबत", राणेपुत्राने शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 09:24 PM2022-03-12T21:24:34+5:302022-03-12T21:37:04+5:30
निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे
मुंबई - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या सुटकेचे भवितव्य येत्या मंगळवारी ठरणार आहे. मलिक यांनी केलेल्या हेबिअस कॉर्पस याचिकेत सुटकेसंदर्भात केलेली अंतरिम मागणी मान्य करायची की फेटाळायची? यावरील निर्णय उच्च न्यायालयाने शुक्रवारी राखून ठेवला. मात्र, नवाब मलिक यांना अटक झाल्यापासून भाजप आक्रमक झाली असून मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. तर, महाविकास आघाडी सरकार त्यांचा राजीनामा घेणार नसल्याने भाजप नेते आक्रमक झाले आहेत. आता, भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेना आणि दाऊदच्या नातेवाईकांचे संबंध असल्याचा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
निलेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, मुंबई महापालिकेच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर दिसत आहेत. तर, याच फोटोत कुख्यात दाऊद इब्राहिमचा भाचा अली शाह पारकर असल्याचा दावा निलेश राणेंनी केला आहे. दाऊद जेवढा पाकिस्तानमध्ये सक्रिय नसेल, त्यापेक्षा अधिक महाविकास आघाडीत सक्रिय दिसतोय, असा गंभीर आरोपही निलेश यांनी ट्विटरवरुन केला आहे. दरम्यान, हा फोटो शिवसेना सदस्यता अभियान मागपाडा शाखा क्रमांक 213 येथील असल्याचे फोटोतील डिजिटल बॅनरवरुन दिसून येते.
दाऊदचा भाचा अली शाह पारकर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासोबत. दाऊद जेवढा पाकिस्तान मध्ये सक्रिय नसेल त्यापेक्षा अधिक महा विकास आघाडीत सक्रिय दिसतोय. pic.twitter.com/F1qBKRhcd1
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 12, 2022
देशमुखांचा राजीनामा घेतला, मग मलिकांचा का नाही?
मराठा समाजाच्या अनिल देशमुखांचा राजीनामा लगेच घेतला, मग नवाब मलिक यांचा राजीनामा अद्याप का घेतला नाही. दाऊदसारख्या देशाचा दुश्मन असलेल्या व्यक्तीच्या माणसांशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मलिकांचा राजीनामा घेतला पाहिजे, असे निलेश राणे यांनी म्हटले. तसेच नवाब मलिक शरद पवारांचे कोण आहेत?, मला कधी-कधी संशय येतो की शरद पवार हेच दाऊदचा माणूस आहेत, असा गंभीर आरोपही निलेश राणेंनी केला आहे.
मलिकांच्या सुटकेबाबत मंगळवारी निर्णय
सुप्रिया सुळेंनी मलिक यांची प्रकृती पाहण्यासाठी भेटायचं म्हणत तत्परता दाखवली. ती तत्परता, काळजी अनिल देशमुखांवेळी कोठे होती, असा प्रश्नही निलेश यांनी केला. नवाब मलिक हे पवार कुटुंबीयांसाठी काही स्पेशल आहेत का, नवाब मलिक शरद पवारांबद्दल काही बोलेन, अशी भिती तर नाही ना?, अशी संशयांस्पद शंकाही निलेश राणेंनी विचारली आहे. दरम्यान, ईडीची कारवाई आणि विशेष न्यायालयाने दिलेल्या कोठडीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या नवाब मलिक यांच्या हेबिअस कॉर्पस याचिकेवर शुक्रवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. त्यानंतर, न्या. पी.बी. वराळे व न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठाने निकाल राखून ठेवला. मंगळवारी निर्णय देऊ, असे खंडपीठाने स्पष्ट केले.