मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील एका हॉटेलसह काही मालमत्तांचा लिलाव मंगळवारी होणार असून, लिलावात हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी हे सहभागी होणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या लिलावात हॉटेल विकत घेण्यात यशस्वी झालो, तर हॉटेल पाडून तिथे शौचालय बांधले जाईल, असे चक्रपाणी यांनी जाहीर केले आहे. परिणामी, मंगळवारी होत असलेल्या दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.सीबीआयने आतापर्यंत केलेल्या कारवाईत दाऊदच्या मुंबई आणि मुंबईबाहेरील एकूण १० मालमत्ता जप्त केल्या आहेत. यामधील तीन मालमत्तांचा लिलाव १४ नोव्हेंबर रोजी होणार आहे. याकूब रस्त्यावरील शबनम गेस्ट हाउस, पाकमोडिया रस्त्यावरील डांबरवाला इमारतीतील ५ घरे आणि हॉटेल रौनक अफरोज यांचा या मालमत्तांमध्ये समावेश आहे. लिलावासाठीच्या हॉटेलची मूळ किंमत १ कोटी १५ लाख ठेवण्यात आली आहे. हे हॉटेल विकत घेण्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी होत असलेल्या लिलावात स्वामी चक्रपाणी सहभाग घेणार आहेत.कार दिली पेटवूनलिलावातील हॉटेल विकत घेण्यात यशस्वी ठरलो, तर तेथे शौचालय बांधेन, असे चक्रपाणी यांनी सांगितले. यापूर्वीही दाऊदच्या संपत्तीचा लिलाव झाला होता. तेव्हा चक्रपाणी यांनी दाऊदची कार विकत घेतली होती. त्यानंतर ती दहशतवादाचे प्रतीक म्हणून त्यांनी गाजियाबाद येथे पेटवून दिली होती.
दाऊदच्या मालमत्तेचा मंगळवारी लिलाव; हॉटेल पाडून शौचालय बांधणार - स्वामी चक्रपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 3:07 AM