रोहित नाईकमुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यापासून आपल्या गावाला वाचविण्यासाठी गोराई गावातील स्थानिकांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी ग्रामस्थ पोलिसांसोबत दिवस-रात्र गावामध्ये पहारा देत असून गावातील लोकांना बाहेर जाण्यापासून, तर बाहेरच्या लोकांना गावात प्रवेश करण्यापासून रोखत आहे. सुमारे ६५ स्थानिकांचा समावेश असलेल्या या ‘टीम’मध्ये तरुणांचा समावेश जास्त आहे.फादर एडवर्ट जसिंटो यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ दिवस-रात्र गावामध्ये पहारा देत आहेत. यामुळे गावात कोणीही विनाकारण फिरताना दिसत नाही. कोणत्याही परिस्थितीत आपले गाव ‘ग्रीन झोन’ ठेवण्याचा निर्धार गोराईकरांनी केला आहे. ‘आपलं गाव, आपली जबाबदारी’ असा नारा देत गावकऱ्यांनी शेपाली, कुलवेम, जुईपाडा आणि वेली बसस्टॉप अशा मुख्य चार ठिकाणी पहारा ठेवला आहे. यामुळे गावात प्रवेश करणाºया, तसेच गावातून बाहेर जाणाºया प्रत्येक व्यक्तीला चौकशीला सामोरे जावे लागत आहे. दिवस-रात्र सुरू असलेल्या या पहाºयामध्ये गावकरी तीन शिफ्टमध्ये काम करतात.फादर जसिंटो यांनी या उपक्रमाविषयी ‘लोकमत’ला सांगितले की, ‘कोरोना विषाणूचा मुंबईत प्रादुर्भाव झाल्यानंतर आम्ही गावात एक बैठक घेतली. आमचे गाव अखेरपर्यंत ग्रीन झोनमध्ये ठेवण्याचा आम्ही निर्धार केला. पोलिसांनीही आम्हाला मदत करत काही बॅरिकेट्स दिल्या. आम्ही गावाचा बाजारही चर्चच्या मैदानात हलविला. यामुळे गर्दीवर नियंत्रण राखता आले. जर अत्यावश्यक कारणासाठी कोणाला बाहेर जायचे असल्यास पूर्ण चौकशी करूनच त्या व्यक्तीला गावाबाहेर जाण्याची परवानगी मिळते. गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे अद्याप गावात कोरोनाचा प्रवेश झालेला नाही.’>गावकºयांनी खूप चांगला उपक्रम राबविला आहे. स्थानिक रहिवासी असल्याने त्यांना गावातील प्रत्येक व्यक्तीची माहिती असते. गावातले कोण आणि गावाबाहेरचे कोण, याची माहिती आम्हाला त्यांच्याकडून मिळते. त्यामुळे आमचे कामही सोपे होते. स्थानिकांच्या पुढाकारामुळे पोलिसांचा भार कमी झाला, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. याआधी २०-२५ लोक विविध कारणाने गावाबाहेर जात होते, पण आता हीच संख्या ४-५ लोकांवर आली आहे. - संजीव नारकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गोराई गाव पोलीस ठाणे
गोराईत ग्रामस्थांचा दिवस-रात्र पहारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 1:10 AM