दिवसरात्र केलेल्या मेहनतीचे फळ, महिला कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 01:24 AM2019-05-24T01:24:07+5:302019-05-24T01:24:22+5:30
मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच युतीचे उमेदवार आघाडी घेऊ लागले.
- शेफाली परब-पंडित
मुंबई : मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच युतीचे उमेदवार आघाडी घेऊ लागले. यामुळे शिवसेना भवनाबाहेर सकाळीच कार्यकर्त्यांनी धाव घेतली. कार्यालयाबाहेर लावलेल्या मोठ्या फ्लेक्सकडे डोळे लावून बसलेले कार्यकर्ते युतीच्या उमेदवाराला लीड मिळताच बेभान होऊन नाचत होते. फटाक्यांची आतशबाजी, पेढेवाटप आणि भगवे झेंडे हवेत उंचावित कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होता.
युतीचे सूर पुन्हा जुळून येताच शिवसेना-भाजपचे बळ वाढले. मुंबईतील प्रत्येकी तीन मतदारसंघांची विभागणी झाली. या मतदारसंघांत युतीचा उमेदवार आपलाच समजून निवडून आणण्यासाठी कार्यकर्ते दिवसरात्र झटत होते. त्याचे फळ आज मिळत असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होती. दादर पश्चिम येथील शिवसेना भवन या मुख्यालयाबाहेर सुरू असलेल्या जल्लोषात सहभागी होण्यासाठी शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विजयी उमेदवार घोषित करण्याआधीच पेढ्यांचे वाटप कार्यकर्ते व या परिसरातून जाणाऱ्या नागरिकांना करण्यात येत होते. भगवे कपडे, भगव्या टोप्या काही कार्यकर्त्यांनी परिधान केल्या होत्या. शिवसेना भवन व आसपासच्या परिसरात भगवे झेंडे लावण्यात आले होते. प्रत्येक निकाल जाहीर होताच फटाक्यांची आतशबाजी होत असे. आणि भगवा झेंडा हवेत उंचावित ढोल-ताशांच्या आवाजात कार्यकर्ते नाचत विजयाचा आनंद व्यक्त करीत होते.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी ११ वाजता शिवसेना भवनात हजेरी लावली. त्यांच्या मागोमाग शिवसेनेचे बडे नेते एक-एक करून कार्यालयात हजर होत होते. त्यांना पेढा भरविण्यासाठी कार्यकर्त्यांचीही धावपळ सुरू होती. नृत्य करून थकलेल्या या कार्यकर्त्यांसाठी खाण्यापिण्याची सोयही करण्यात आली होती. महिला कार्यकर्त्याही या जल्लोषात आघाडीवर होत्या.
शिवसेना भवनबाहेरील रस्त्यावर वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी ही बाब लक्षात आणून देताच कार्यकर्त्यांना रस्ता मोकळा करण्याची सूचना करण्यात आली. त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी पदपथाचा ताबा घेत आपला जल्लोष सुरू ठेवला. ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशी घोषणाबाजी अधूनमधून होत होती.
>भगवा झेंडा आणि ठाकरेंचे छायाचित्र
शिवसेनेचा निष्ठावान कार्यकर्ता आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भक्त आहे. त्यांच्या या भावना कॅश करण्यासाठी भगवा झेंडा, बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र, पक्षाचे चिन्ह असलेले बिले, शिवसेनेवरील पुस्तकांचे स्टॉल शिवसेना भवनबाहेरील पदपथावर होते. या स्टॉलवर कार्यकर्त्यांची गर्दी होती.