‘ईद’च्या दिवशी आवाज १०५ डेसिबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 06:50 AM2017-12-04T06:50:38+5:302017-12-04T06:50:49+5:30
देशभरात ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईद साजरी करत असताना अनेक ठिकाणी लावण्यात आलेले लाऊडस्पीकर्स, मिरवणुका आणि भोंग्यांचा आवाज हा शंभर डेसिबलहून अधिक होता.
मुंबई : देशभरात ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईद साजरी करत असताना अनेक ठिकाणी लावण्यात आलेले लाऊडस्पीकर्स, मिरवणुका आणि भोंग्यांचा आवाज हा शंभर डेसिबलहून अधिक होता. ध्वनिप्रदूषणाबाबत जनजागृती करणाºया सुमैरा अब्दुलाली यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी ईदच्या मिरवणुकांच्या वेळी होत असलेला आवाजाच्या नोंदी घेतल्या आहेत. याआधारे ही माहिती समोर आली आहे.
भायखळा येथील अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाजवळ १०३.५ डेसिबल आवाजाची नोंद झाली. तर अनेक ठिकाणी रुग्णालयांजवळील परिसरात आवाजाची पातळी शंभर डेसिबलपेक्षा जास्त होती, असेही अब्दुलाली यांनी सांगितले. मुंबईतील अनेक ठिकाणी घेतलेल्या आवाजाच्या नोंदी आणि मागील वर्षी ईद-ए-मिलादच्या वेळी काढलेल्या मिरवणुकांच्या आवाजाच्या घेतलेल्या नोंदी सुमैरा अब्दुलाली यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनाही पाठविल्या आहेत.
मागील वर्षी मुंबईत जे.जे. रुग्णालय परिसरात सर्वाधिक १११.५ डेसिबल इतक्या आवाजाची नोंद करण्यात आली होती, तर २०१४ साली माहीम येथे सर्वाधिक १०४.५ डेसिबल इतक्या आवाजाची नोंद करण्यात आली होती.
आवाजाच्या नोंदी
ईदनिमित्त सायंकाळी ५.३० ते ६.०४ दरम्यान विविध ठिकाणी मिरवणुका, लाउडस्पीकर्स यांचा झालेला गोंगाट
ठिकाण आवाज
(डेसिबल)
रे रोड स्थानक ९७.५
डॉकयार्ड रोड स्थानक १०५.२
प्रिन्स अली खान १०२.५
रुग्णालय
मोहम्मद अली रोड ९२.५
जे. जे. रुग्णालय ९५
भायखळा पूल ८५-९०