त्यादिवशी मुंबई अंधारात गेली, तो घातपातच होता, ऊर्जामंत्र्यांचा धक्कादायक खुलासा
By महेश गलांडे | Published: March 1, 2021 03:18 PM2021-03-01T15:18:42+5:302021-03-01T15:36:40+5:30
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भात माहिती देताना, सायबर विभागाकडून सायंकाळी या वीज पुरवठा खंडीत प्रकरणाचा अहवाल येणार असून सर्व स्पष्टीकरण देईल, असे आज विधिमंडळात सांगितलं
मुंबई - राजधानी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा वीजपुरवठा १२ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता खंडित झाला होता. त्यानंतर अडीच ते तीन तासांनी वीज पुरवढा सुरळीत व्हायला सुरुवात झाली. राज्यात कोरोनाचं संकट असल्याने हॉस्पिटल्समधल्या वीज पुरवढ्याबाबत प्रशासन चिंतेत होतं. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधित सर्व विभागांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत दिले होते. त्यानंतर, आता मुंबईतील वीजपुरवठा खंडीत होणं हे घातपात असल्याचा निष्कर्ष हाती आला आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यासंदर्भात माहिती देताना, सायबर विभागाकडून सायंकाळी या वीज पुरवठा खंडीत प्रकरणाचा अहवाल येणार असून सर्व स्पष्टीकरण देईल, असे आज विधिमंडळात सांगितलं. ''मुंबई अंधारात गेली होती, मुंबईतील वीजपुरवठा अचानक खंडीत झाला होता. त्यावेळी, मी घातपात असल्याचं सूतोवात मी केलं होतं. पण, अनेकांनी मला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वस्तूस्थिती अशी आहे की, तो घातपातच होता. यासंदर्भात सायबर विभागाकडून मला संध्याकाळी 6 वाजता अहवाल देण्यात येईल. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर हा रिपोर्ट मला मिळेल, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं. वॉशिंग्टन पोस्टमध्ये जो रिपोर्ट आलाय, त्यासंदर्भातही सर्व माहिती मी तिथेच देईल,'' असेही राऊत यांनी सांगितलं. त्यामुळे, मुंबई ब्लॅक आऊटचा नेमका घातपात काय होता, हे जाणून घेण्याची उत्सुकता मुंबईसह महाराष्ट्राला लागली आहे.
Maharashtra state government takes cognisance of a media report, claiming Mumbai power outage was a likely Chinese cyber attack. Home minister Anil Deshmukh seeks a report from the cyber department over it.
— ANI (@ANI) March 1, 2021
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी उर्जा विभागाचं टेक्निकल ऑडिट करण्याचेही आदेश आजच्या बैठकीत दिले होते. वीज पुरवठा खंडीत झाल्याप्रकरणी काही बेजबाबदार अधिकाऱ्यांवरही कारवाई होऊ शकते. तसेच, असा प्रकार पुन्हा घडू नये याचीही काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले होते.
त्यादिवशी सकाळी नेमकं काय झालं?
10 ऑक्टोबर पासूनच कळवा-तळेगाव पॉवर ग्रीड ही ब्रेकडाउन होती.
सोमवार सकाळी 4.33 वाजता कळवा पडघा ही लाईन ट्रिप झाली.
त्यानंतर कळवा पडघा ही लाईन 10.1 वाजता कोलमडून गेली.
तळेगाव-खारघर ही लाईन 0.02 वाजता ट्रिप झाली.
तर पालघर ग्रीडच्या 3 लाईन्स 10.5 वाजता ट्रिप झाल्यात.
तळेगाव--खारघर या ग्रीड मध्ये तर शॉर्ट सर्किट सारख्या ठिणग्या उडत होत्या.
या सगळ्यांचा परिणाम म्हणजे मुंबईत बत्ती गुल झाली.
वीज नियामक आयोगाने घेतली होती सुनावणी
या प्रकरणाबाबत महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने ऑनलाइन सुनावणी घेतली होती. त्यावेळी महापारेषण, टाटा, अदानीसारख्या वीज कंपन्यांनी आपआपले म्हणणे मांडले. कळवा वाहिनी बंद पडल्यानंतर खारघरवर लोड आला. खारघरवर लोड वाढला तेव्हा खारघर-तळेगाव वाहिनी बंद केली. त्यामुळे मुंबईचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी, ही लाइन (वाहिनी) बंद करण्याची गरज होती का? असा मुद्दा या वेळी उपस्थित करण्यात आला. अशा प्रकरणांत ग्राहकांची प्राथमिकता ठरविणे गरजेचे आहे. अर्थात अत्यावश्यक सेवांना सेवा देणे आवश्यक असते. रेल्वे किंवा रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडित होता कामा नये, याकडे लक्ष द्यायला हवे. मात्र प्राथमिकता पाळली गेली नाही; हा मुद्दाही सुनावणीवेळी मांडण्यात आला.