सोशल मीडियाच्या जमान्यात युवा वर्ग साहित्याकडे!
By admin | Published: February 7, 2017 04:26 AM2017-02-07T04:26:20+5:302017-02-07T04:26:20+5:30
६९व्या महात्मा गांधी पुण्यातिथीनिमित्त आयोजित सहा दिवसांच्या गांधी पुस्तक प्रदर्शनाला तरुण पिढीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
मुंबई : ६९व्या महात्मा गांधी पुण्यातिथीनिमित्त आयोजित सहा दिवसांच्या गांधी पुस्तक प्रदर्शनाला तरुण पिढीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. आजच्या आयफोन्स, टॅबलेट्स आणि ई-बुक्सच्या दुनियेत, तरुणवर्गाच्या हातात पुस्तक सापडणे कठीण दिसते, परंतु बाबुलनाथ मंदिर चॅरिटिज् व महालक्ष्मी मंदिर चॅरिटिज्च्या साहाय्याने, मुंबई सर्वोदय मंडळ आणि गांधी बुक सेंटरतर्फे आयोजित केलेल्या गांधी पुस्तक प्रदर्शनात हा समज तरुणांनी चुकीचा ठरविला आहे.
महात्मा गांधीजींच्या ६९व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ३० जानेवारी ते ४ फेब्रुवारीदरम्यान आयोजित गांधी पुस्तक प्रदर्शनात, केवळ सहा दिवसांतच सुमारे २.१२ लाख किमतीच्या गांधी-विनोबा-आंबेडकर व सर्वोदय पुस्तकांची विक्री झाली. मराठीमध्ये गांधीजींच्या आत्मकथा ‘माझे सत्याचे प्रयोग’, ‘गीता प्रवचन’, ‘सिलेक्टेड वर्क्स आॅफ महात्मा गांधी’ या पुस्तकांना अधिक मागणी होती. याशिवाय, आर्थिक, राजकीय, कायदा, शिक्षण, आध्यात्म व आरोग्यावरील गांधी पुस्तकांना वाचकांनी अधिक पसंती दिली. प्रदर्शनात आंबेडकरी साहित्यालाही लक्षणीय मागणी होती. बेस्ट सेलर पुस्तक ‘माझे सत्याचे प्रयोग’ या गांधीजींच्या आत्मकथेच्या १६ विभिन्न भाषांमधील दीड लाखांहून अधिक प्रती गेल्या एक वर्षात नवजीवन ट्रस्टतर्फे विकल्या गेल्या आहेत. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या असमानता, बेकारी व हिंसेच्या युगात, गांधी विचारांची निर्विवाद गरज ओळखून या पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या बहुतांश नागरिकांनी अशा प्रकारच्या प्रदर्शनाचे आयोजन महाराष्ट्रातील शहरांमध्ये वर्षातून अनेक वेळा करण्याबद्दल मागणी केली. गांधी पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्वोदय मंडळाचे संकेतस्थळावर सुमारे २४ हजार ६६४ लोकांनी भेट देऊन गांधीजी, तसेच अहिंसा, शांती व इतर विषयांबद्दल माहिती मिळविली. (प्रतिनिधी)