न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत दिवसाढवळ्या बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:07 AM2021-06-16T04:07:04+5:302021-06-16T04:07:04+5:30
मनोहर कुंभेजकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत असलेल्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत मंगळवारी दिवसाढवळ्या ...
मनोहर कुंभेजकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगत असलेल्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीत मंगळवारी दिवसाढवळ्या बिबट्याची दहशत व वावर असल्याने येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
येथील इन्फिनिटी आयटी पार्कच्या लगत असलेल्या न्यू दिंडोशी म्हाडा वसाहतीतील गिरीकुंज सोसायटी इमारत क्रमांक ५ मध्ये गेली तीन दिवस भटकी कुत्री पकडण्यासाठी मध्यरात्री बिबट्या येतो. सोमवारी मध्यरात्री तर त्याने येथील एका भटक्या कुत्र्याची शिकार केली होती. मात्र, मंगळवारी चक्क दुपारी दीडच्या सुमारास येथील सोसायटीच्या मागील बाजूस बिबट्या येथील संरक्षक भिंतीवरून चालत असल्याचे येथील लहान मुलांच्या लक्षात आले. त्यामुळे येथील नागरिकांनी टेरेसवरून बिबट्याच्या वावराचे व्हिडिओ मोबाईलमध्ये बंदिस्त केले, अशी माहिती या सोसायटीच्या रहिवासी डॉ. रामेश्वरी पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास इमारत क्रमांक ७ व ८ च्या मागील बाजूस असलेल्या संरक्षक भिंतीवरून ऐटीत चालताना नागरिकांनी पाहिला. बिबट्याचा वावर या भागात आज दुपारी होता.
आता परत भक्ष्य शोधण्यासाठी मध्यरात्री बिबट्या परत येईल का या भीतीने येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या बिबट्याच्या वावराचे व्हिडिओ नागरिकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले.
नोव्हेंबर २०१८ मध्ये बिबट्या इमारत क्रमांक ५ मध्ये तीन-चारवेळा इकडे आला होता. त्यावेळी शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद, स्थानिक आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी येथे भेट देऊन या घटनेची दखल घेतली होती आणि त्यांच्या आमदार निधीतून संरक्षक भिंत देखील आम्हाला बांधून दिली होती, अशी माहिती डॉ. रामेश्वरी पाटील यांनी दिली.
गेले तीन-चार दिवस येथील बिबट्याचा असलेल्या वावराची आमदार सुनील प्रभू यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरगे, तसेच वनविभागाचे सचिव व वनसंरक्षक अधिकारी श्री. रामाराव वनसंरक्षक ठाणे विभाग यांच्याशी संपर्क साधून या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाचे पथक पाठवून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
लोकमतने रामाराव यांच्याशी संपर्क साधला असता, येथील बिबट्याच्या दहशतीची माहिती आमदार प्रभू यांनी आपल्याला दिली आहे. आमची टीम येथे पाठवत असून जर नागरिकांना बिबट्याचा त्रास होत असेल तर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव, नागपूर यांच्या परवानगीने येथे पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
------- - - - ----------