प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारताची पहिली स्पोर्ट्स कार डीसी अवंती बनविणाऱ्या डीसी डिझाईनचे संस्थापक दिलीप छाब्रिया यांचा ‘कार’नामा उघड करून गुन्हे शाखेने त्यांना अटक केली. डीसी डिझाइन कंपनीने एकाच रजिस्ट्रेशनने गाड्या विकल्या. या गाड्यांवर बाेगस कागदपत्र दाखवून कर्ज घेत, ४० कोटींचा घोटाळा केला आहे.
सीआययूचे प्रमुख सचिन वाझे यांना बोगस क्रमांक असलेल्या डीसी कारबाबत माहिती मिळाली. १८ डिसेंबरला ताज हॉटेल परिसरात सापळा रचून त्यांनी एक डीसी कार जप्त केली. मालकाकडून गाडीची कागदपत्रे तपासली असता, ती कार चेन्नईच्या पत्त्यावर रजिस्टर असल्याची माहिती समोर आली. पुढील तपासात, दुसरी गाडी त्याच क्रमांकावर हरयाणामध्ये रजिस्टर होती. हाच धागा पकडून केलेल्या तपासात अशा प्रकारे ९० गाड्यांबाबत घोटाळा केल्याची माहिती समोर आली. एकाच चेसी आणि इंजीन नंबरच्या आधारे या गाड्या विकण्यात आल्या.
छाब्रिया यांच्या डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना १४ जून १९९३ मध्ये झाली. २०१५ मध्ये ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांचे क्लिअरन्स सर्टिफिकेट मिळाल्यानंतर २०१६ मध्ये डीसी अवंती कारचे लॉन्चिंग झाले. पुण्यातील त्यांच्या प्लांटमध्ये या डीसी अवंती कार बनविल्या जात होत्या.
आतापर्यंत १२० डीसी अवंती कार भारतासह भारताबाहेर विकल्या गेल्या आहेत. यात एका गाडीची किंमत अंदाजे ४२ लाख रुपये आहे. त्यामुळे हा ४० कोटींचा घोटाळा असल्याची शक्यता सहआयुक्त मिलिंद भारांबे यांनी वर्तविली. तसेच दिलीप छाब्रिया डिझाइन्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी स्वतः बनविलेल्या गाड्या स्वतः विकत घेतल्या. ९० गाड्यांवर एकापेक्षा जास्त फायनान्स कंपनीकडून बनावट कागदपत्रांद्वारे कर्ज घेण्यात आल्याची माहिती तपासात समाेर आली.
दरम्यान, २०१८ मध्ये दिलीप छाब्रिया डिझाइन प्रायव्हेट लिमिटेड यांनी स्वत:च्या कंपनीला दिवाळखोरी घोषित करण्याची तयारी केली होती.
सोमवारी रात्री छाब्रिया यांना अंधेरीतून अटक केली असून, २ जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे सरकारचा महसूल बुडाला असून, सीआययूचे पथक अधिक तपास करीत आहे. ही कारवाई सहपोलीस आयुक्त मिलिंद भारांबे, अपर पोलीस आयुक्त वीरेश प्रभू, पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
* क्रिकेटरची न्यायालयात धाव
भारताची पहिली स्पोर्ट्स कार म्हणून प्रसिद्ध असलेली डीसी अवंती यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. २०१३ मध्ये बुकिंग करूनही वेळेत डिलिव्हरी न देता, आगाऊ भरलेले पाच लाख रुपये परत न मिळाल्याने क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांनी चेन्नईच्या ग्राहक न्यायालयात २०१५ मध्ये धाव घेतली होती.
..............................