मुंबई : मध्य रेल्वेने दुष्काळग्रस्तांना निधी देण्यासाठी अजब फंडा तयार केला आहे. हार्बर मार्गावर डीसी (१,५00 व्होल्ट डायरेक्ट करंट) ते एसी (२५,000 व्होल्ट अल्टरनेट करंट) परिवर्तनाचे काम होणार आहे. हे काम होण्यापूर्वी शनिवारी रात्री डीसी विद्युप्रवाहावरील शेवटचा विशेष लोकल प्रवास प्रवाशांना घडविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यासाठी तीन डबे राखीव ठेवणार असून, प्रत्येक प्रवाशामागे दहा हजार रुपये आकारण्यात येणार आहेत. यातून जमा होणारा निधी दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे.डीसी विद्युतप्रवाहावरील पहिली लोकल ३ फेब्रुवारी १९२५ रोजी मुंबई ते कुर्ला या मार्गावर धावली होती. शेवटचा डीसी लोकल प्रवास ऐतिहासिक करण्यासाठी जे.जे.स्कूल आॅफ आर्ट्ससह मध्य रेल्वेने नियोजन केले आहे. येत्या ९ एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजता शेवटची डीसी लोकल कुर्ल्याहून सीएसटीसाठी सुटेल. ही लोकल मध्यरात्री सव्वा बारा वाजता सीएसटी स्थानकात पोहोचेल. ही लोकल ४0 वर्षे जुनी असेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. नऊ डब्यांच्या या विशेष लोकलमध्ये तीन डबे प्रवाशांसाठी राखीव असतील. या डब्यातील प्रत्येक प्रवाशामागे दहा हजार रुपये तिकीट आकारण्यात येणार आहेत. जे.जे.स्कूल आॅफ आर्ट्सकडून याची तिकिट विक्री केली जाईल. चौकशी आणि तिकिटे मिळविण्यासाठी ९0२९0८२६९0 क्रमांकावर एसएमएस किंवा २२६२१६४९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. दहा हजार रुपयांची तिकिटे घेणाऱ्या प्रवाशांचा खास पाहुणचार केला जाईल. लोकलमधून प्रवास झाल्यानंतर प्रवाशांना सीएसटीच्या खास दालनात नेण्यात येईल आणि होणाऱ्या डीसी-एसी परिवर्तनाचे थेट व्हिडीओ चित्रीकरणही पाहता येणार आहे. (प्रतिनिधी)
डीसी लोकल तिकीट १० हजार रुपयांचे
By admin | Published: April 08, 2016 2:26 AM