Ajit Pawar left Cabinet Meeting: विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता केव्हाही लागण्याची शक्यता असताना महायुती सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये निर्णयांचा सपाटा लावला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत सुमारे ४० निर्णय घेण्यात आले आहेत. महिन्याभरात मंत्रिमंडळ बैठकीत सरकारने तब्बल १६५ त्या आसपास निर्णय घेतल्याने पुरेस निधी नसल्याने या निर्णयांची अंमलबजावणी कशी होणार अशी चर्चा सुरु झालीय. दुसरीकडे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे नाराज असल्याचे म्हटलं जात आहे. याचाच प्रत्यय मंत्रिमंडळ बैठकीत आला. माध्यमांच्या वृत्तानुसार अजित पवार यांनी नाराज होत मंत्रिमंडळाची बैठक १० मिनिटांतच सोडल्याचे म्हटलं जात आहे. मात्र आता अजित पवार यांनी या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे.
गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतून अजित पवार हे केवळ १० मिनिटांत बाहेर पडले. ही बैठक तब्बल दोन ते अडीच तास सुरु होती. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत अनेक महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णवेळ उपस्थित होते. अजित पवार नाराजीमुळे निघून गेल्याची चर्चा सुरु झाल्यावर आता त्यांनीच याबाबतीत माहिती दिली आहे. काल मंत्रिमंडळ बैठक लवकर सोडून गेलेलो नाही असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगूनच बाहेर पडल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीत दहा मिनिटांमध्ये सोडून बाहेर पडलो ही बातमी तथ्यहीन असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. लातूरच्या उदगीर येथील कार्यक्रमासाठी लवकर निघालो असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
"मी काल कॅबिनेट लवकर सोडून गेलो नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नियोजित कार्यक्रम लातूर येथे होता. त्यासाठी नांदेड विमानतळ येथे जायचे होते आणि मंत्रिमंडळ बैठक ११ वाजता होती. ही बैठक नियोजित वेळेपेक्षा उशीरा सुरु झाली. त्यामुळे महत्वाच्या विषयांची चर्चा कॅबिनेटमध्ये झाल्यानंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून मी नियोजित लातूर उदगीर येथे कार्यक्रम यासाठी निघालो. मंत्रिमंडळ बैठकीत दहा मिनिटांमध्ये सोडून बाहेर पडलो ही बातमी तथ्यहीन आहे," असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे.
अजित पवारांनी एवढा उशीर का केला? अंबादास दानवे "अजित पवार कडक शिस्तीचे नेते आहेत. सरकारमध्ये असले तरी कडक आर्थिक शिस्त ते पाळत असतात. आर्थिकदृष्ट्या न परवडणारे निर्णय आताचे सरकार घेत आहे. त्यामुळे आपण कर्जबाजारी झालो आहोत. आर्थिक स्थितीच्या बाबतीत अजित पवार यांचे नेतृत्व संवेदनशील आहे. त्यामुळे त्यांनी अशी भूमिका मांडली असेल तर त्यांनी एवढा उशीर का केला असा माझा प्रश्न आहे," असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.